नवी दिल्ली : सध्याचा जमाना 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक थक्क करणार्या गोष्टी केल्या जात आहेत. आता त्याचा वापर अंध व्यक्तींना रस्ता दाखवणार्या चष्म्यामध्ये करण्यात आला आहे. भविष्यात असा चष्मा अंध व्यक्तींना जवळच्या ठिकाणांचे मार्ग सांगेल व त्याप्रमाणे ते चालू शकतील. तसेच अन्यही अनेक बाबतीत हा चष्मा अंध व्यक्तींना मार्गदर्शन करू शकतो.
बिलासपूर सिम्सच्या डॉक्टरांनी या 'स्मार्ट व्हिजन' चष्म्याची माहिती दिली आहे. असे चष्मे चार वर्षांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेत बनवण्यात आले होते. भारतात या तंत्राचा शोध दिल्लीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राकेश जोशी यांनी अधिक सरस तंत्रज्ञान व कमी खर्चात लावला आहे. सहा महिन्यांपूर्वी देशात अशा आर्टिफिशियल ग्लासेसची निर्मिती सुरू करण्यात आली. इस्रायल व अमेरिकेत तयार होणार्या चष्म्यांमध्ये पाच ते आठ भाषांचा समावेश होता. डॉ. जोशींनी यामध्ये तब्बल 72 भाषा समाविष्ट केल्या आहेत. हे चष्मे मोबाईल अॅपद्वारे काम करतात. त्यांनी तयार केलेल्या चष्म्याची किंमत 48 हजार रुपये आहे.
अमेरिकन व इस्रायलच्या चष्म्याची किंमत 6.30 लाख रुपये आहे. डॉ. जोशी यांनी म्हटले आहे की हा चष्मा पाच मोडवर काम करतो. यामध्ये पाच बटणे आहेत. पहिले बटण दाबल्यावर चष्म्यासमोर काय आहे हे समजते. दुसरे वाचन मोड. ते दाबल्यावर अंध व्यक्तीला पुस्तक, वर्तमानपत्र किंवा लिखित मजकूर वाचून दाखवेल. तिसरे चालण्याचे मोड. ते दाबल्यावर तीन मीटरच्या अंतरावर काय आहे याची माहिती मिळेल. चौथा मोड चेहरा ओळख. समोरची व्यक्ती कोण आहे हे समजेल. पाचवा मदत मोड आहे. एखादी अंध व्यक्ती कुठे तरी भरकटली असेल तर तिचे स्थान कुटुंबीयांपर्यंत पोहोचते.