मोगलीसारखे जंगलात बालपण घालवलेला माणूस | पुढारी

मोगलीसारखे जंगलात बालपण घालवलेला माणूस

रिओ डी जनैरो : ‘जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है’ गाण्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात लांडग्यांबरोबर बागडणारा मोगली बालचमुच्या भावविश्वात विराजमान झालेला आहे. रूडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या पुस्तकातील हे काल्पनिक पात्र कार्टून मालिकेमुळे घरोघरी पोहोचले. टारझन असो किंवा मोगली, जंगलात एकटेच वन्यप्राण्यांसह राहणार्‍या बालकांच्या गोष्टी वाचून आपल्याला वाटते की वास्तवात असे होऊ शकते का? खरे तर जंगलात बालपण घालवणारी अनेक माणसं या जगात आहेत. त्यामध्येच ब्राझीलमधील एल्सिओ अल्वेस डो नॅसिमेंटो यांचा समावेश होतो.

सन 1978 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी एल्सिओ यांचे त्यांच्या भावासह खेळण्यावरून भांडण झाले आणि त्यानंतर ते घरातून निघून गेले होते. त्यांनी सांगितले, ‘माझे वडील खूप कडक स्वभावाचे होते. त्यांनी मला काठीने मारले आणि मग मी नदीच्या दिशेने पळत गेलो. नदीत उडी मारून मी पोहत दुसर्‍या काठाला गेलो; पण तोपर्यंत मी घरापासून बराच दूर गेलो होतो आणि हरवलोही होतो. त्यावेळी माझे वय होते आठ वर्षे. मी घरी पोहोचण्याचा प्रयत्न करीत होतो; पण हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.

एक रात्र जंगलात घालवली. नुसतं चालत राहिलो; पण जंगलातून बाहेर पडू शकलो नाही. पावसाळ्यात मी एका गुहेत झोपायचो आणि फळे, नारळ व जंगलातील अन्य पदार्थ खायचो. अनेक वेळा प्राण्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण मी गुहेत शिरून किंवा झाडावर चढून स्वतःला वाचवले. मला समजून चुकले की येथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. मी जमिनीवर झोपलो नाही, नेहमी झाडावरच झोपत होतो.’

वयाच्या अकराव्या वर्षी एका शेतकर्‍याने एल्सिओ यांना जंगलात पाहिले आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, जंगलात घालवलेल्या तीन वर्षांचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. जंगलात राहिल्याने त्यांचा आवाज कर्कश झाला आहे. मानवी जगात मिसळण्यासाठी त्यांना वेळ लागला. माणसासारखे जगायला शिकल्यावर ते स्वयंपाकही शिकले. त्यानंतर त्यांनी लग्नही केले. सध्या 53 वर्षांचे असलेले एल्सिओ ईशान्य ब्राझीलमधील बाहिया राज्याच्या बॅक्सियो गावात लाईफगार्ड म्हणून काम करतात. जंगलात प्राण्यांप्रमाणे राहणे ही सोपी गोष्ट नाही असे ते आवर्जून सांगतात!

Back to top button