

मेक्सिको : पृथ्वीतलावरील वनसंपदा, निसर्ग, नानाविध पक्षी, वनचर, वनचरातील नवनव्या प्रजाती या सर्वांचे आपापले वेगवेगळे वैशिष्ट्य असते. नवनव्या प्रजातीवर सातत्याने संशोधन होत असते आणि त्यातून नवनवे शोध लागत असतात. वैज्ञानिकांनी आता सरड्याची अशी आगळीवेगळी प्रजाती शोधून काढली आहे, जी चक्क प्रथमदर्शनी महाकाय मगरीप्रमाणे भासते.
आतापर्यंतचे शोध नजरेखालून घातले असता, जगभरात असे अनेक सरडे आहेत, ज्यातील काही ना काही वेगळेपण अधोरेखित होत आले आहे. सध्या समोर आलेला सरडा मात्र बराच वेगळा आहे. तो चक्क मगरीसारखा असल्याचा संशोधकांनी दावा केला आहे आणि याचमुळे मेक्सिकोमध्ये सापडलेला हा सरडा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संशोधकांना मेक्सिको सिटीच्या दक्षिण-पूर्वेला सुमारे 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या चियापासमधील कोपिला या शहरात हा मगरीसारखा सरडा सापडला आहे.
शास्त्रज्ञांना दक्षिण मेक्सिकोमध्ये झाडांवर मगरीसारखा खवले असलेला प्राणी सापडला असून हा प्राणी प्रत्यक्षात सरडा आहे. सरड्यांची ही एक नवीन प्रजाती आहे. त्याला एब्रोनिया क्युनेमिका किंवा कोपिला आर्बोरियल एलिगेटर लिझार्ड असे नाव देण्यात आले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, हे सरडे सुमारे 9.8 इंच लांब असू शकतात आणि त्यांचे शरीर पिवळे-तपकिरी खवल्यांचे असते. ते गडद तपकिरी डागांनी झाकलेले आहे. त्याचे डोळे हलके पिवळे आहेत आणि गडद आहेत, याचाही संशोधनात उल्लेख करण्यात आला आहे.
हा अनोखा महाकाय सरडा पानांमध्ये लपलेला असतो आणि बहुतेक सकाळी किंवा दुपारी बाहेर येतो. प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 2014 मध्ये या सरड्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर संशोधकांनी 2015 ते 2022 दरम्यान एकूण 5 मोहिमा केल्या आणि सरड्यासारखे अन्य प्राणी शोधून काढले. मियामी हेराल्डच्या रिपोर्टनुसार, या सरड्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुमारे 20 झाडांवर चढून 350 तासांपेक्षा जास्त वेळ खर्ची घातला आणि त्यानंतर या महाकाय सरड्याचा शोध लागला, असे यावेळी सांगण्यात आले.