

रायपूर : या जगात छंदिष्टांची काहीही, याचा अनेकदा याचि देही, याचि डोळा प्रत्यय येत असतो. असे छंदिष्ट आपला छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात आणि यासाठी कितीही, कोणतेही मोल मोजावे लागले तरी ते यातून मागे हटत नाहीत. पण, काही जणांचे छंद निव्वळ आश्चर्याचा धक्का देणारे असतात. छत्तीसगडमधील राजनांदगाव या जिल्ह्यातील मेहूल लखानी हा देखील अशाच काही छंदिष्टांपैकी एक असून त्याने चक्क उलट्या पावलांनी भारत भ्रमणाचा छंद सुरू करण्याचा विडा उचलला आहे.
मेहूल लखानीची ही वेगळी व अनोखी यात्रा अनेकांना थक्क करायला लावणारी ठरते आहे. मेहूल या यात्रेवर तिरंगा घेऊन उलट्या दिशेने चालत भारतभ्रमण करण्याच्या इराद्याने बाहेर पडला आहे. आता उलटे चालत जाण्याचे कारण काय आहे, हे विशद करत असताना त्याने भारताच्या वैभवशाली संस्कृतीचा दाखला दिला आहे. मेहूल लखानीने यापूर्वी अनेक सायकल यात्राही केल्या आहेत आणि यासाठी तो चक्क दोन दोन वर्षे बाहेर राहिला आहे. त्याने मध्य प्रदेशपासून नेपाळ व भूतानपर्यंत 46 हजार किलोमीटरची यात्रा 27 महिन्यांत पूर्ण केली होती. यामुळे त्याला 'मेहूल भारत यात्री' असे टोपण नावाने ओळखले जाते.
यंदा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्याने उलट चालत पायी यात्रेचा संकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा वसा उचलला आणि त्याचा श्रीगणेशाही केला आहे. प्रारंभी त्याने स्थानिक मंदिराला भेट दिली आणि नगरी डोंगरगड येथून उलटे चालत आपल्या अनोख्या पदयात्रेला सुरुवात केली. त्याच्या पाठीवर एक बॅग असून तो उलटा चालत भारत यात्रेवर निघाला आहे. राजनांदगाव येथून निघाल्यानंतर दुर्ग, भिलाई मार्गे रायपूरला पोहोचत तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असून त्यानंतर अयोध्येला भेट देणार असल्याचे त्याने याप्रसंगी सांगितले आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर तेथून तो विविध राज्यांना भेटी देणार आहे.