मालदीवच्या सत्‍तारूढ सरकारची खाेल समुद्रात कॅबिनेट बैठक; गूढ विषयावर आत्मचिंतन, सरकार 30 मिनिटे पाण्याखाली! | पुढारी

मालदीवच्या सत्‍तारूढ सरकारची खाेल समुद्रात कॅबिनेट बैठक; गूढ विषयावर आत्मचिंतन, सरकार 30 मिनिटे पाण्याखाली!

माले-मालदीव : सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवचा हॅशटॅग आता बर्‍याच ट्रेंडमध्ये आहे. मात्र, याच मालदीवमध्ये एकदा अशीही घटना घडली, ज्यावेळी तेथील सत्तारूढ केंद्र सरकारने चक्क समुद्रात, खोल पाण्यात कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले आणि यामुळे त्यांचे पूर्ण सरकार चक्क 30 मिनिटे पाण्याखाली एका गूढ विषयावर खोल आत्मचिंतन करत राहिले होते!

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मालदीवसारख्या राष्ट्रांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असताना ते अगदी बुडून जाण्याचा धोका होता. मालदीवचा बहुतांशी भाग समुद्र सपाटीपासून एक मीटर वर असल्याने हा धोका अधिक होता. त्या पार्श्वभूमीवर, ऑक्टोबर 2009 मालदीवने या जागतिक समस्येचे  गांभीर्य अधोरेखित करत असताना पूर्ण विश्वाला संदेश द्यावा, या उद्देशाने त्यांनी आपली कॅबिनेट बैठक समुद्राखाली आयोजित केली.

साधारणपणे समुद्रात 15 फूट पाण्याखाली ही बैठक घेण्यात आली. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला 11 मंत्री व कॅबिनेट सचिव देखील सहभागी झाले होते. या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांनी पाण्यात खोल उतरत हजेरी लावली.

या बैठकीसाठी खोल पाण्यात टेबल मांडण्यात आले आणि राष्ट्रपतींसह सर्व मंत्र्यांच्या आसपास मासे विहार करत असताना दिसून आले. या सर्वांनी हातवार्‍याच्या माध्यमातून संवाद साधला आणि वॉटरप्रूफ बोर्डवर खास शाईने सही देखील केली. एखाद्या देशातील कॅबिनेट बैठक समुद्राखाली होण्याची ती जागतिक स्तरावरील पहिलीच वेळ होती.

अर्थात, या अभूतपूर्व बैठकीला आता 15 वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आताही या प्रश्नाचे गांभीर्य अजिबात कमी झालेले नाही. उलट, सद्यस्थितीत अधिकच चिंतेची परिस्थिती असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास 2100 सालापर्यंत हा देश समुद्राखाली गाडला जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

Back to top button