650 फुटांवरून सावज हेरतो हार्पी गरुड | पुढारी

650 फुटांवरून सावज हेरतो हार्पी गरुड

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात खतरनाक शिकारी पक्ष्यांमध्ये हार्पी गरुडचा समावेश होतो. या गरुडाची द़ृष्टी माणसांपेक्षा थोडीथोडकी नव्हे तर चक्क आठपट अधिक तीक्ष्ण असते. हा गरुड 650 फूट अंतरावरून एक इंचापेक्षा लहान आकाराचे सावज देखील सहजपणे हेरू शकतो. घुबडाप्रमाणे त्याची हालचाल लवचिक असते. तसेच, या गरुडाला चपळपणा आणि वेगासाठीही ओळखले जातो. सध्या सोशल मीडियावर हार्पी गरुडाशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ केवळ 11 सेकंदांचा आहे. हार्पीच्या चेहर्‍यावरील पंख त्यांची श्रवणक्षमता वाढवण्यात मदत करतात. त्याची द़ृष्टी खूप तीक्ष्ण आहे. तो आपल्या लवचिक मानेच्या सहाय्याने झाडावर राहणार्‍या प्राण्यांची शिकार करण्यातही माहीर आहे.

या गरुडाचे पंजे सुमारे चार ते पाच इंच लांब असतात आणि त्यांची रचना ग्रीझली अस्वलाच्या पंजांसारखी असते. त्याची चोचही कठीण व तीक्ष्ण असते. त्यांच्या पंखांचा आकार अंदाजे साडेसहा फूट असतो. त्यांची शिकार करण्याची पद्धत अगदी अनोखी आहे. शिकारीसाठी भटकंती करण्यास आणि पाठलाग करण्यास ते उत्सुक नसतात. त्याऐवजी, ते एका जागी बसून शिकारीची वाट बघतात, हे देखील त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.

संबंधित बातम्या

‘हार्पी’ हा शब्द ग्रीक पौराणिक कथांशी संबंधित आहे आणि दक्षिण अमेरिकन संशोधकांनी त्याची निर्मिती केली आहे. ग्रीक पौराणिक कथेतील ‘हार्पी’ हा शब्द असे देव किंवा प्राण्यांचा संदर्भ देतो जे अर्धे पक्षी, अर्धे मानव अशा रूपात असून, ते वादळवार्‍याचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे हार्पी गरुड हे सर्वात वजनदार आणि सर्वात मोठे शिकारी पक्षी आहेत. एका पक्ष्याचे वजन 20 पाऊंडपर्यंत असते. त्यांची उंची 40 इंच असू शकते. हार्पी गरुड हा पनामाचा राष्ट्रीय पक्षी, कोलंबियन वायुसेनेचे प्रतीक आणि इक्वाडोरच्या जैवविविधतेचे प्रतीक म्हणूनही ओळखले जातो.

Back to top button