सर्वात महागडा लिफाफा! | पुढारी

सर्वात महागडा लिफाफा!

कॅलिफोर्निया : आहेर करताना आपल्याला सर्वात प्रथम आठवते ते आहेराचे पाकीट. एरवी कधीही आपल्याला लिफाफ्याची आठवणही येणार नाही. पण, आहेर करताना मात्र या लिफाफ्याची जागा काहीही घेऊ शकणार नाही. आता असा हा लिफाफा असून असून किती किमतीचा असू शकेल, असा प्रश्न पडेल. लिफाफे तसे अगदी दोन-पाच रुपयांनाही मिळून जातील; पण डिझायनिंग असेल, तर त्याची किंमत 50 रुपयांच्या आसपास पोहोचू शकते.

अलीकडे लिफाफ्यांवर आता नाणीही चिकटवलेली असतात. पण, त्याचीही किंमत यापेक्षा अधिक असत नाही. पण, एक कंपनी अशीही आहे, जी चक्क एक लिफाफा थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क 10 हजार रुपयांना विकते आणि म्हणूनच या लिफाफ्यात असे नेमके काय वैशिष्ट्य आहे की, ती इतकी महाग विकली जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.

आता एरवी लिफाफे कागदी असतात. पण, हा खास प्रकारचा लिफाफा तयार करण्यासाठी रेशमी धागे वापरले जातात आणि यामुळेच हा लिफाफा अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. हा लिफाफा तयार करणार्‍या कंपनीने आपल्या वेबसाईटवर असे म्हटले आहे की, हे पाकीट विशेष प्रक्रियेतून तयार केले जाते आणि यामुळे हा लिफाफा कितीही वापरला तरी तो फाटत नाही. या लिफाफ्याची निर्मिती हर्मीस इंटरनॅशनल या कंपनीने केली असून ही कंपनी आपल्या लक्झरी ब—ँडसाठी आजवर विशेष प्रकाशझोतात राहिली आहे.

संबंधित बातम्या

या कंपनीचा इतिहास असा आहे की, त्यांचे जवळपास प्रत्येक उत्पादन उच्च श्रेणीतील आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडील असेल. या कंपनीने तयार केलेला एक पेनसुद्धा अगदी थोड्याथोडक्या नव्हे, तर 20 हजारांचा आहे. अशा पार्श्वभूमीवर डायरी, नोटपॅड यांच्या किमतीची चौकशी न केलेलीच बरी. तरी एक बाब राहतेच राहते, ती म्हणजे, हा लिफाफाच फक्त 20 हजार रुपयांचा असेल, तर मग त्यातील भेटवस्तू किती असावी, याचा फक्त विचारच केलेला बरा!

Back to top button