डायनासोरला आधी होते ‘मेगालोसॉरस’ नाव! | पुढारी

डायनासोरला आधी होते ‘मेगालोसॉरस’ नाव!

लंडन : पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी विविध प्रजातीच्या डायनासोरचेच साम्राज्य होते. एका लघुग्रहाची धडक व अन्य काही कारणांमुळे डायनासोरचा र्‍हास झाला. त्यांच्याबाबतची माहिती विज्ञानाला दोनशे वर्षांपूर्वी सर्वप्रथम मिळाली. त्यावेळी लंडनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नवीन जियोलॉजिकल सोसायटी बनवण्यात आली होती. तिचे पहिले प्रोफेसर होते विल्यम बकलँड. त्यांनीच जगाला सांगितले की, कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर विशाल सरडे वावरत होते. त्याला त्यांनी नाव दिले होते ‘मेगालोसॉरस’.

विल्यम यांना एका विशाल डायनासोरचे जीवाश्म सापडले होते. तो एक जबडा होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी या जीवाला नाव दिले ‘मेगालोसॉरस’. हे नाव ‘डायनासोर’ नावाच्या आधी सुमारे वीस वर्षांपूर्वी देण्यात आले होते. हे अवशेष ब्रिटनच्या स्थानिक खाणीत सापडले होते. त्यावेळी या प्राण्यांविषयी कुणाला माहिती नव्हती. या जीवाचे दात पाहून त्यांनी अंदाज लावला की, तो मांसाहारी असावा. त्यांनी असाही अंदाज लावला की, त्याची उंची 40 फूट असावी आणि तो चार पायांवर चालत असावा. तो पाणी व जमीन अशा दोन्ही ठिकाणी वावरत असावा, असेही त्यांना वाटले.

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे संस्थापक आणि संशोधक रिचर्ड ओवन यांनीच पहिल्यांदा या जीवाला ‘डायनासोर’ असे नाव दिले. त्यावेळी लंडनच्या क्रिस्टल पार्कमध्ये सन 1854 च्या सुमारास या जीवाची एक प्रतिमाही बनवण्यात आली, ज्यामध्ये तो चार पायांवर उभा असलेला दिसत आहे. पुढे आणखी संशोधन झाल्यावर समजले की, डायनासोर हे चार नव्हे, तर दोन पायांवर चालत होते. नॅशनल हिस्ट्री म्युझियमनुसार डायनासोर बाथोनियन काळात होते. हा काळ सुमारे 16 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांनी डायनासोरच्या एक हजार प्रजातींची माहिती मिळवलेली आहे.

संबंधित बातम्या
Back to top button