दुबईत भारतीय ड्रायव्हरला 45 कोटींची लॉटरी! | पुढारी

दुबईत भारतीय ड्रायव्हरला 45 कोटींची लॉटरी!

दुबई : कुणाचे नशीब कुठे उघडेल हे काही सांगता येत नाही. दुबईत तर अनेक भारतीय लोक लॉटरीमुळे मालामाल झालेले आहेत. आताही संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणार्‍या एका भारतीयाचे नशीब एका क्षणात बदलले आहे. त्याच्यासोबत असे काही घडले आहे, ज्यावर आपला काय त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नाहीये. ही सध्या दुबईत राहते आणि तिथे एक ड्रायव्हर म्हणून काम करते. या व्यक्तीने तब्बल 45 कोटी रुपये जिंकले आहेत. मुनव्वर फिरोज असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने येथे लॉटरीत ही रक्कम जिंकली आहे.

त्याने 31 डिसेंबर 2023 ला बिग तिकिट लाईव्ह ड्रॉमध्ये 20 दशलक्ष यूएई दिरहमचे जॅकपॉट बक्षीस जिंकले आहे. त्यामुळे मुनव्वरसाठी नवीन वर्षाची सुरुवात खूप खास झाली आहे. त्याने आपल्या नावाने जे लॉटरी तिकीट घेतले होते त्यासाठी 30 जणांनी मिळून पैसे दिले होते. त्यामुळे आता ही जिंकलेली रक्कम या सर्व लोकांमध्ये वाटली जाईल. खलीजा टाईम्सच्या वृत्तानुसार, मुनव्वर हा गेल्या बराच काळापासून बिग तिकिटाचा ग्राहक आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो दर महिन्याला लॉटरीची तिकिटे खरेदी करत आला आहे. त्याने खरंच लॉटरी जिंकली आहे, यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नाही. याबाबत मुनव्वर म्हणाला, ‘खर सांगायचं तर, मला असे होईल अशी अपेक्षा नव्हती, त्यामुळे मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये.’

मुनव्वर व्यतिरिक्त, इतर दहा विजेत्यांना प्रत्येकी 22 लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये भारतीय, पॅलेस्टिनी, लेबनीज आणि सौदी अरेबियाच्या नागरिकांचा समावेश आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, यूएईमध्ये अनेक भारतीयांनी लॉटरी जिंकली आहे. 31 डिसेंबर रोजी सुतेश कुमार कुमारेसन नावाच्या भारतीय व्यक्तीनेही लॉटरी जिंकली आहे. त्याला सुमारे दोन कोटी रुपये मिळाले आहेत. सुतेश इतिहाद एअरवेजमध्ये इंजिनिअर असून, तो अबुधाबीमध्ये राहतो, अशी माहिती आहे.

Back to top button