विद्यार्थ्याने बनवला जनावरांना शेतापासून दूर ठेवणारा अलार्म

विद्यार्थ्याने बनवला जनावरांना शेतापासून दूर ठेवणारा अलार्म

गोरखपूर : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, गीडा गोरखपूरच्या कॉम्प्युटर सायन्सच्या दुसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या विद्यार्थ्याने 'ग्रीन लँड माईन अलार्म' नावाचे एक उपकरण बनवले आहे. हे उपकरण भटक्या जनावरांना शेतातील पिकांपासून दूर ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहे. या उपकरणाच्या सहाय्याने भविष्यात शेतकरी आपल्या पिकांना भटक्या जनावरांपासून सुरक्षित ठेवू शकतील.

या विद्यार्थ्याचे नाव आहे अविनाश वरुण. आपल्या देशातील अनेक शेतकरी, विशेषतः पूर्वांचलमधील शेतकरी भटक्या जनावरांमुळे त्रस्त असतात. त्यांना रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी मोहिमाही राबवल्या जातात. मात्र, त्यांचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही. भटकी जनावरे अनेकवेळा शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असतात.

आता या उपकरणामुळे त्यांच्या उपद्रवापासून शेतकर्‍यांची सुटका होऊ शकेल. 'आयटीएम'च्या विद्यार्थ्याने बनवलेले हे उपकरण त्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ते बनवणारा विद्यार्थी अविनाश वरुण याने सांगितले, 'ग्रीन लँड माईन अलार्म' हे शेताच्या बांधावर लावता येते. ते स्टिलपासून बनवलेल्या डब्याच्या किंवा पेटीच्या स्वरूपात असते. त्यामध्ये 3.7 व्होल्टच्या बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ती एकदा चार्ज केल्यावर सहा ते आठ महिने चालते.

या उपकरणात एक स्विच सेन्सर लावला आहे, ज्यावर दाब पडला की हे उपकरण सक्रिय होते. त्यामध्ये शेतकर्‍याचा मोबाईल नंबर सेट करता येतो. एखादे जनावर शेतात घुसले की हे ग्रीन सेंसर अ‍ॅक्टिव्ह होते आणि लाईट ब्लिंकिंगबरोबरच तीव्र आवाजाचा अलार्म वाजवू लागते. तसेच सेट केलेल्या नंबरवर कॉलही जातो. त्यामुळे वेळीच शेतीचे नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. या ग्रीन लँड माईनचे वजन सुमारे 200 ग्रॅम आहे. त्यामध्ये ट्रान्समीटर, अलार्म, लाईट, स्विच आहे. हे उपकरण एका आठवड्यात बनवले गेले व त्यासाठी तीन ते चारशे रुपयांचा खर्च आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news