नवी दिल्ली : सोशल मीडियाचे काही तोटे आहेत तसेच काही फायदेही आहेत. अनेकांच्या कलागुणांना सोशल मीडियाने नवे व्यासपीठ दिलेले आहे. तसेच नव्या संकल्पना लोकांपुढे पोहोचविण्यासाठीही या माध्यमाचा चांगला वापर होत असतो. आता असाच एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये काचेच्या बाटल्यांचा वापर करून बांधल्या जाणार्या घराची माहिती मिळते.
टाकाऊ बाटल्यांचा वापर करून एका इंजिनिअरने हे बांधकाम केले आहे. विटा आणि सिमेंटबरोबरच त्याने एकावर एक बाटल्यांचा थर रचत अख्खे घर उभे केले. त्याच्या या स्थापत्य कौशल्याचे अनेकांनी कौतुकही केले. यापूर्वी काही लोकांनी प्लास्टिकच्या समस्येवर उपाय म्हणून टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचाही असाच उपयोग केला होता. त्यामुळे अनेकांना या इंजिनिअरची कल्पना आवडली. सिमेंटचा थर रचून त्यावर एकाच आकाराच्या या बाटल्या ओळीने ठेवल्या जातात. त्यावर पुन्हा सिमेंटचा थर ओतून या थरावर बाटल्यांचा आणखी एक थर लावला जातो. अशा पद्धतीने तयार केलेल्या भिंतीही अतिशय सुंदर दिसतात व गृहसजावट घर बांधण्यापूर्वीच तयार होत जाते.