प्राचीन युरोपमधील लोक बोटं कापून करीत अर्पण | पुढारी

प्राचीन युरोपमधील लोक बोटं कापून करीत अर्पण

लंडन : हल्ली ‘बॉडी मॉडिफिकेशन’च्या नावाखाली शरीर विद्रुप करून घेणारे अनेक महाभाग पाहायला मिळतात. चारचौघांपेक्षा आपण वेगळे दिसावे, एखादा विक्रम व्हावा या हेतूने असे लोक कधी जिभेचे दोन भाग करून घेतात तर कधी ओठ मोठे करून घेतात. काहींनी तर आपली बोटंही कापली आहेत. विशेष म्हणजे बोटं कापून घेणारी माणसं प्राचीन काळातही अस्तित्वात होती. पश्चिम युरोपमध्ये पाषाण युगातील स्त्री-पुरुष देवतांना अर्पण करण्यासाठी आपली बोटं कापून घेत असत.

संशोधकांनी अशा प्रथेचे काही पुरावे शोधले आहेत. काही गुहांमध्ये अशी शेकडो भित्तीचित्रे आढळली आहेत ज्यामध्ये हाताच्या पंज्याचे किमान एक बोट गायब होते. कॅनडाच्या व्हँक्युअरमध्ये सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटीतील प्रा. मार्क कोलार्ड यांनी सांगितले की या गोष्टीचे ठोस पुरावे आहेत की, या लोकांनी देवतांकडून सहाय्य मागण्यासाठी आपली बोटं कापून अर्पण केली होती.

कोलार्ड यांनी नुकतेच आपल्या संशोधनाचे पेपर सादर केले. ज्यामध्ये फ्रान्स आणि स्पेनमध्ये 25 हजार वर्षांपूर्वी हाताच्या ठशांच्या चित्रांची माहिती देण्यात आली आहे. या 200 ठशांपैकी प्रत्येकात किमान एक बोट गायब होते. काही ठशांमध्ये हाताची अनेक बोटं गायब होती. असा प्रकार आजही काही समुदायांमध्ये दिसून येतो. न्यू गिनी हायलँडस्मधील महिला आजही जवळच्या नातलगाचे निधन झाले तर संकेत म्हणून आपले बोट कापतात.

Back to top button