गाढव पाळले आणि त्याचे नशीबच फळफळले! | पुढारी

गाढव पाळले आणि त्याचे नशीबच फळफळले!

मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथे एक अजब घटना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आहे. श्रीनिवास गौडा हा तेथील एका सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी. त्याचा नोकरीत उत्तम जमही बसला होता; पण तोचतोपणा होऊ लागल्याने त्याला या जम बसलेल्या नोकरीचाही कंटाळा आला आणि त्याने नोकरीचा राजीनामा दिला. आता राजीनामा दिला, इथवर ठीक होते; पण त्यानंतर त्याने जे केले, ते निव्वळ आश्चर्याचा धक्का देणारे होते. या अवलियाने जून 2022 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर चक्क गाढव पाळणे सुरुवात केले.

प्रारंभी, हा अर्थातच सर्वांच्या चेष्टामस्करीचा विषय होता आणि तो झालाही; पण याच नव्या प्रयोगाने त्याला अल्पावधीत लखपती बनवले. गाढव ज्यांना ढ समजलं जातं; पण अशाच गाढवाने या अवलियाचे नशीब पालटून टाकले. या अवलियाने फक्त पाच दिवसांत लाखो रुपये कमावले आणि तोच सपाटा यापुढेही कायम राहील, असेच संकेत आहेत.

श्रीनिवासने नोकरी सोडल्यानंतर देशातील पहिले डाँकी फार्म उघडले आणि गाढविणीचे दूध विकायला सुरुवात केली. फक्त 5 दिवसांत त्याला 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली. आता श्रीनिवास डाँकी फार्मच्या माध्यमातून खूप यशस्वी व्यापारी बनला आहे. सुरुवातीच्या टप्प्याबद्दल बोलताना श्रीनिवास सांगतो, जेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांना डाँकी फार्मबद्दल सांगितले तेव्हा सर्वजण त्याची चेष्टा करायचे. सुमारे वीस गाढवांसह त्याने हा व्यवसाय सुरू केला आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या पाच दिवसांत त्यांना 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली.

गाढविणीचे दूध जगात सर्वात महाग विकले जाते. अनेक देशांमध्ये त्याची किंमत प्रतिलिटर दहा हजारांपर्यंत आहे. भारतात या दुधाची मागणी कमी आहे; पण किंमत खूप जास्त आहे. त्याच्या दुधापासून बनवलेले चीजही महागड्या दराने विकले जाते. गाढविणीच्या दुधात अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. याशिवाय सौंदर्य उद्योगातदेखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, याचे अनेक दाखले मिळत आले आहेत.

Back to top button