2300 वर्षांपूर्वीच्या भव्य मोझॅकचा रोममध्ये शोध | पुढारी

2300 वर्षांपूर्वीच्या भव्य मोझॅकचा रोममध्ये शोध

रोम : पुरातत्त्व संशोधकांनी रोममधील पॅलेटाईन हिलवरील 2300 वर्षांपूर्वीच्या घरात सुंदर चमकदार रंगाच्या भिंतीवरील मोझॅकचा शोध लावला आहे. ही सुंदर खोली रोमन काळातील एका मोठ्या अधिकार्‍याच्या आलिशान निवासस्थानाचा एक भाग होता. ही खोली म्हणजे त्या काळातील बँकेट हॉल म्हणजेच मेजवानीची खोली होती.

शहराच्या मध्यवर्ती भागापासून दक्षिणेकडे काही अंतरावर हे आलिशान ठिकाण होते. रोमच्या मध्यवर्ती भागात प्राचीन काळातील महत्त्वाची मंदिरे आणि शासकीय इमारती होत्या. हे घर एखाद्या रोमन सिनेटरचे असावे असे संशोधकांना वाटते. त्याने कदाचित लढाईमध्ये सैन्याचे नेतृत्वही केलेले असावे. त्याच्या घरातील या मेजवानीच्या कक्षातील भिंतीवर हे सुंदर मोझॅक तयार करण्यात आले होते. ते शिंपले, इजिप्शियन निळसर दगड-गोटे, काचेचे तुकडे, रंगीत संगमरवराचे तुकडे आणि अन्य खड्यांनी सजवलेले आहे.

‘रस्टिको’ शैलीत हे मोझॅक बनवलेले आहे. रोमच्या कोलोसियम आर्कियोलॉजिकल पार्कचे संचालक अल्फोन्सिना रुसो यांनी सांगितले की हे मोझॅक अतिशय अपवादात्मक आहे. आम्हाला शिकण्यासाठी काही तरी नवे यामधून मिळाले आहे. पॅलेटाईन हे रोमच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते. या परिसरात पाच वर्षे उत्खनन केल्यानंतर हा बँक्वेट हॉल आणि त्यामधील मोझॅक समोर आले.

Back to top button