वॉशिंग्टन : वाचनाची आवड कमी होत आहे, विशेषतः मुलं वाचन करीत नाहीत, अशी ओरड अनेक वर्षांपासून ऐकू येते; मात्र 'हॅरी पॉटर' कादंबर्यांना मिळालेल्या 'छप्पर फाड के' यशानंतर हा समज तितका खरा नाही असेही दिसून आले. आता तर फोन, लॅपटॉप, ओटीटी कंटेन्टच्या लोकप्रियतेच्या या काळात पुस्तक वाचनासाठी 'रीडिंग पार्टी' आयोजनाचा ट्रेंड वाढू लागला आहे.
अमेरिकेत सध्या हे चित्र दिसून येते. काही पुस्तकप्रेमी तरुणांनी यंदा पुस्तक वाचनासाठी 'रीडिंग र्हिदम्स'ची सुरुवात केली. ही कल्पना प्रचंड लोकप्रिय होत आहे. 'रीडिंग र्हिदम्स' स्वत:ची ओळख 'रीडिंग पार्टी' अशी करून देते. यात सहभागी लोक आपल्या पसंतीचे पुस्तक एक तास अगदी शांतपणे वाचतात. त्यानंतर या पुस्तकाबद्दलचे मत घेण्यासाठी चर्चा केली जाते.
न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमधील चक्क एका बारमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या नित्याच्या झाल्या आहेत. महानगरातील रेस्टॉरंट, उद्याने, घराच्या गच्चीवरही तरुणांचे गट एकत्र येऊन वाचनानंद घेऊ लागले आहेत. लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को व परदेशात क्रोएशियात रीडिंग पार्ट्या झाल्या आहेत. या पार्ट्यांत 60-70 लोकांचा सहभाग असतो. अनेकदा त्यात 200 वर लोकही सहभागी होतात. हे लोक स्वेच्छेने 10 डॉलर अर्थात सुमारे 832 रुपयांची देणगीही देतात.
बुक रीडिंग पार्टीचा खर्च सर्वांनी मिळून उचलणे हा त्यामागील उद्देश असतो. बेन ब्रॅडबरी, शार्लोट जॅक्सन, जॉन लिफिएरी, टॉम वार्सेस्टर या विशीतील तरुणांना पुस्तक वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याबद्दल चिंता वाटत होती. त्यानंतर रीडिंग र्हिदम्सचा जन्म झाला. एकाग्रता कमी होऊन फोनमध्ये वेळ जात आहे हे त्यांचे निरीक्षण होते. म्हणून समविचारींचा शोध घेतला गेला. रीडिंग र्हिदम्स स्वत:ची ओळख पुस्तक क्लब अशी सांगत नाही. उलट 'वाचकांची पार्टी' अशा स्वरूपात ते स्वत:ला संबोधतात.