आठ हजार वर्षांपूर्वी सैबेरियात होता ‘किल्ला’ | पुढारी

आठ हजार वर्षांपूर्वी सैबेरियात होता ‘किल्ला’

बर्लिनः रशियाच्या सैबेरिया या अतिथंड भागात जगातील पहिला किल्ला बांधण्यात आला होता, असा दावा संशोधकांनी केला आहे. पश्चिम सैबेरियातील अम्निया नदीकाठी काही शिकार्‍यांनी संरक्षणाच्या हेतूने हा किल्ला बांधला होता, असे जर्मनीतील फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमधील संशोधकांनी म्हटले आहे. या पुरातत्त्व संशोधकांनी छोट्या गढींसारखे असलेले वीस पिटहाऊसचे अवशेष शोधले आहेत. या सर्वांची मिळून झालेली रचना सुरक्षित किल्ल्यासारखीच होती.

याठिकाणी ‘अ‍ॅम्निया1’ आणि ‘अ‍ॅम्निया2’ असे दोन भाग करण्यात आलेले आहेत. रेडिओकार्बन डेटिंगने येथील वसाहत मेसोलिथिक किंवा मध्य पाषाणयुगातील असल्याची पुष्टी केली आहे. ‘अँटिक्वीटी’ नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमधील संशोधक टांजा श्रिबर यांनी सांगितले की जुन्या काळातील मानवी वसाहती प्राथमिक स्वरूपाच्या होत्या या धारणेला आता छेद गेला आहे. त्या काळातील लोकांमध्येही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गढीसारखी रचना करण्याचे कौशल्य होते. ज्यावेळी त्याचे बांधकाम झाले त्यावेळी प्रत्येक पिटहाऊस मातीच्या भिंती आणि लाकडी कुंपणाने वेढलेले होते. त्यावरून असे दिसते की सैबेरियन तैगा प्रदेशात सुरक्षेच्या दृष्टीने 8 हजार वर्षांपूर्वीही बांधकाम केले जात होते. हे लोक शिकारी असले तरी ते शेती करू लागले होते. अशा गढींमुळे ते आपलया मासेमारी व शिकारीच्या प्रदेशावरही ताबा ठेवत होते. मात्र त्यांना असा किल्ला बनवण्याचा आदेश कुणी दिला हे एक गूढच आहे.

Back to top button