रिओ डी जनैरो : जगाच्या पाठीवर काही झाडेही अतिशय अनोखी आहेत. कॅलिफोर्नियातील सर्वात उंच, अनेक वर्षे वय असलेल्या व डेरेदार झाडांची तर जगभर ओळख आहे. ब्राझिलमध्ये असेच एक वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे. काजूचे हे झाड इतके मोठे आहे की ते एखाद्या जंगलासारखेच वाटते. रियो ग्रांदे नॉर्ट या राज्याची राजधानी असलेल्या नेटालजवळ समुद्रकिनार्यावर हे झाड आहे.
या झाडाला 'कॅश्यू ऑफ पिरांगी' या नावानेही ओळखले जाते. या झाडाची नोंद गिनिज बुकमध्येही आहे. 'जगातील सर्वात मोठे काजूचे झाड' म्हणून ही नोंद आहे. विशेष म्हणजे या झाडाची आणखी वाढ सुरूच आहे. सध्या या झाडाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. वर्षभर या झाडापासून अनेक टन काजू मिळतात. लाल, पिवळ्या रंगाच्या फळात तीन संत्र्यांच्या बरोबरीचे 'क' जीवनसत्त्व असते. हे काजूचे झाड दोन एकर परिसरात पसरले आहे. आकाराने ते सामान्य आकाराच्या 70 काजू झाडांइतके आहे. हे झाड शंभरपेक्षाही अधिक वर्षे जुने आहे. सन 1888 मध्ये लुइस इनासियो डी ओलिवेरा नावाच्या एका स्थानिक मच्छीमाराने ते लावले होते. या झाडाचा इतका मोठा आकार त्यामधील जनुकीय म्युटेशनमुळे झाला आहे.