अठरा वर्षांपासून डोक्यात होती गोळी! | पुढारी

अठरा वर्षांपासून डोक्यात होती गोळी!

बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून येमेनच्या नागरिकाला जीवदान दिले आहे. डॉक्टरांनी येमेनी नागरिकावर शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यात 18 वर्षांपासून अडकलेली गोळी यशस्वीरित्या बाहेर काढली. या व्यक्तीवर 18 वर्षांपूर्वी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या व्यक्तीचे दोन्ही कान बहिरे झाले होते. येमेनमध्ये खूप वर्षे उपचार करूनही त्याला या समस्येपासून सुटका मिळाली नव्हती. अखेर या येमेनी नागरिकाने भारतात यायचा निर्णय घेतला आणि बंगळुरुमधील डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले.

या येमेनी पुरुषावर बंगळुरू येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीच्या डोक्यातून तीन सेंटीमीटरची गोळी काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याची प्रकृती एकदम ठीक असून, तो मायदेशी येमेनला परतला असल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. बंगळुरूच्या एस्टर आरव्ही हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपूर्वी दोन गटांमध्ये भांडण झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं की, यावेळी गोळीबारही झाला. या गोळीबारामध्ये व्यक्तीच्या डोक्यात गोळी घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. गोळी लागल्यानंतर तो बहिरा झाला होत आणि त्याला दोन्ही कानांनी काहीही ऐकू येत नसल्याचं या व्यक्तीने सांगितले. या व्यक्तीने अनेक मोठ-मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला, पण सर्वांनी त्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने तो निराश झाला होता, पण त्याने हार मानली नाही. अखेर त्याने उपचारासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्याने बंगळुरूमध्ये एस्टरने आरव्ही हॉस्पिटलमध्ये येऊन ऑपरेशन केले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोळी डाव्या टेम्पोरल बोनमध्ये खोलवर गेली होती, ज्यामुळे शस्त्रक्रियेचे मोठे आव्हान होते. गोळी काढताना चूक झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होता. मात्र शल्यचिकित्सकांच्या पथकाने रुग्णाच्या कानातली तीन सेंटीमीटर लांबीची गोळी यशस्वीरीत्या काढली.

Back to top button