सूर्यावरील स्फोटाने दोन तास रेडिओ सिग्नल्स ठप्प | पुढारी

सूर्यावरील स्फोटाने दोन तास रेडिओ सिग्नल्स ठप्प

वॉशिंग्टन : सूर्य आपल्या अकरा वर्षांच्या सौरचक्राच्या चरमस्थानी पोहोचलेला आहे. त्यामुळे ’सनस्पॉट’च्या घटनाही वेगाने वाढल्या आहेत. नुकतीच सूर्याच्या पृष्ठभागावर अतिशय मोठ्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटाची तीव्रता पाहून वैज्ञानिकही थक्क झाले. या स्फोटाने मोठ्या प्रमाणात सौरज्वाळा अंतराळात विखुरल्या गेल्या. या सौरवादळामुळे पृथ्वीवर दोन तास रेडिओ सिग्नल्समध्ये अडथळा आला.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, 2025 पर्यंत सूर्यावर असेच आणखी स्फोट होत राहतील. त्याचा परिणामही पृथ्वीवर पाहायला मिळेल. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या स्फोटाला सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने रेकॉर्ड केले आहे. हा गेल्या अनेक वर्षांच्या काळात पाहण्यात आलेला सर्वात चमकदार सोलर फ्लेअर होता. यामुळे पृथ्वीवरील रेडिओ सिग्नल्समध्ये मोठा व्यत्यय आला.

या तीव्र सौर हालचालींमुळे अमेरिकेतील काही भागांसह जगभरातील वेगवेगळ्या सूर्यप्रकाशित भागांतील रेडिओ कम्युनिकेशन्समध्ये दोन तास बिघाड निर्माण झाला. त्याचा परिणाम विमानांचे उड्डाण करीत असलेल्या पायलटांच्या कामावरही झाला. त्यांना कम्युनिकेशन्समध्ये अडचणी आल्या. अंतराळातील हवामानावर लक्ष ठेवणारी एक प्रमुख अमेरिकन सरकारी संस्था स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने संपूर्ण देशभर सोलर फ्लेअर्सच्या व्यापक प्रभावांची पुष्टी केली.

Back to top button