Heart attack : कमी वयात हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर ‘हे’ करा… | पुढारी

Heart attack : कमी वयात हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर 'हे' करा...

नवी दिल्ली : सध्याच्या काळात तरुणाईमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आढळते. अनेकजण नाचताना, गातानाही अचानक हार्ट अ‍ॅटॅक येऊन मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. नुकतेच एका चित्रपटाचे शूटिंग आटोपून घरी परतलेल्या अभिनेता श्रेयस तळपदेलाही हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधीही सुष्मिता सेन व अन्य काही कलाकारांनाही हार्ट अ‍ॅटॅकचा सामना करावा लागला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर योग्य जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले हे काही उपाय : आठवड्यातून 150 मिनिटे वेगवान वॉक (चालणे) करा. धूम्रपानाचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम होतो. बिडी, सिगारेट आणि इतर धूम्रपानाच्या पदार्थांच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो. जे लोक दिवसातून अनेकवेळा धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत व्यक्तीने ताबडतोब धूम्रपानापासून दूर राहावे. जास्त साखर आणि जंक फूडदेखील हृदयासाठी धोकादायक आहे.

त्यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.आजच्या काळात बहुतांश लोक तणावाचा सामना करीत आहेत. हळूहळू त्याचे रूपांतर चिंता आणि नैराश्यात होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. यासाठी जास्त ताण न घेता तणावावर नियंत्रण ठेवणं गरेजचं आहे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी शक्य तितके शारीरिकरीत्या सक्रिय व्हा. दररोज किमान 7-8 तास पुरेशी झोप घ्या, असे तज्ज्ञ सांगतात.

Back to top button