

वॉशिंग्टन : 'स्पेस एक्स', 'एक्स' आणि 'टेस्ला'चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी आता एक नवा रोबो सादर केला आहे. 'टेस्ला'च्या या ह्युमनॉईड रोबो म्हणजेच मानवाकृती रोबोची आता सर्वत्र चर्चा आहे. 'ऑप्टिमस जेन 2' नावाचा हा नव्या पिढीचा रोबो असून हे अपग्रेडेड मॉडेल तीस टक्के अधिक वेगाने चालू शकते. तसेच त्याच्यामधील संतुलनही अधिक चांगले आहे. त्याचे वजनही आधीच्या तुलनेत दहा किलोने कमी आहे. 'टेस्ला'चे सीईओ मस्क यांनी या रोबोचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो नृत्य व स्क्वॅट करीत असताना दिसून येतो.
'ऑप्टिमस'साठी ही बरीच मोठी प्रगती आहे. याचे कारण म्हणजे एक वर्षापूर्वीपर्यंत तो मदतीशिवाय चालूही शकत नव्हता. ऑप्टिमस रोबोला सर्वप्रथम सप्टेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आले होते. हा 5.8 फूट उंच आणि सुमारे 50 किलो वजनाचा रोबो आहे. टेस्ला फॅक्टरीमध्ये या रोबोचा वापर होईल. सुपरमार्केटमधील खरेदीपासून ते फॅक्टरी प्रॉडक्शन लाईनवर काम करण्यापर्यंतची अनेक कामे हा रोबो करू शकेल. टेस्लाने या रोबोच्या किमतीविषयी काहीही सांगितलेले नाही.
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये हा रोबो स्वतःचे संतुलन साधत स्क्वॅट करताना दिसतो. तसेच तो नृत्यही करू शकतो. त्याच्या हातांची रचनाही बदलण्यात आली आहे. नाजूक आणि मजबूत वस्तूंना कसे पकडावे व कसे उचलावे याची त्याला समज आहे. व्हिडीओमध्ये तो अंडी उचलून अन्यत्र ठेवत असताना दिसतो. हा रोबो चक्क योगासनेही करू शकतो हे विशेष!