शेतकरी तरुणाने पोत्यांपासून बनवले स्वेटर शर्ट-पँट! | पुढारी

शेतकरी तरुणाने पोत्यांपासून बनवले स्वेटर शर्ट-पँट!

नवी दिल्ली : शेतकर्‍यांना सर्व ऋतूंत शेतात काबाडकष्ट करावे लागतात. काळ्या आईची सेवा करीत असताना बळीराजाला थंडी, वारा, पावसाची आणि उन्हाचीही तमा नसते. मात्र, शरीराचे आरोग्य सांभाळायचे असेल तर काही गोष्टींची काळजीही घ्यावीच लागते. थंडीच्या दिवसात स्वेटर किंवा ऊबदार कपडे आवश्यक असतात. मात्र, यामध्येही एक शेतकरी तरुणाने साधेपणाने मार्ग शोधला आहे. हा मार्ग साधा असला तरी सुंदरही आहे. त्याने चक्क पोत्यांपासून शर्ट व पँट बनवले असून त्यांचा वापर स्वेटरसारखा नेहमीच्या कपड्यांवर करता येतो!

या शेतकरी तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या शेतकरी तरुणाने धान्यांच्या पोत्यांपासून स्वेटर बनवले आहे. स्वेटरमध्ये शर्ट आणि पँटसुद्धा बनवली आहेत. शेतकर्‍यांकडे धान्यांचे पोते भरपूर असतात, त्यामुळे सहज आणि कोणताही खर्च न करता शेतकरी बांधव हे स्वेटर बनवू शकतात. हे पोते खूप उबदार सुद्धा असतात त्यामुळे हे स्वेटर घातल्यानंतर थंडीपासून बचाव करता येईल. ही कल्पकता पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मार्केटमध्ये यायला पाहिजे, खूपच विकला जाईल!” तर एका यूजरने लिहिलेय, “हा खरंच खूप देखणा दिसतोय.” आणखी एका यूजरने लिहिलेय, “शेतकरी एक नंबर” अनेक यूजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत. हा शेतकरी कुठला आहे हे समजण्यास मार्ग नाही!

Back to top button