

लंडन : जगभरात केकची एक विशेष 'इंडस्ट्री'च आहे. अनेक प्रकारचे केक बनवले जात असतात. त्यामध्येही अनेक कलाकृती पाहायला मिळतात. वजन, चव आणि वैशिष्ट्ये यानुसार केकच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. आता एक असा केक आला आहे ज्याची किंमत एखाद्या कारपेक्षा किंवा छोट्या घरापेक्षाही अधिक आहे!
वाईल्ड बेरी क्रिस्टल मॅकरॉन चीजकेक असे या केकचे नाव आहे. हा जगातील सर्वात महागडा गोल्ड मॅकरॉन केक आहे. त्याची किंमत 7,703 डॉलर्स म्हणजेच 8 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. या बेकरीमध्ये आणखी एक केक आहे ज्याची किंमत 1500 डॉलर्स म्हणजेच एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
पोम्पोन व्हेनिला कारर्मेल ग्रेड-ए केकला सर्वात महागड्या व्हेनिला आणि शुद्ध सोन्याच्या वर्खने सजवले आहे. या केकसोबत येणारी पेस्ट्रीही 78 कॅरेट शुद्ध सोन्याची आहे. अर्थातच या केकची चव सुंदर असते; पण त्याची कलाकुसरही खासच आहे. हा केक तयार करण्यासाठी मेहनतही अधिक घ्यावी लागते. ज्यावेळी पोम्पॉन व्हॅनिला कारमेल ग्रेड ए केक कापला जातो त्यावेळी त्याच्या आत एक मुलायम पांढरा थर असतो. वाईल्ड क्रिस्टल मॅकरॉन चीजकेकच्या आत अनेक लेअर्स असतात ज्यांना बाहेरून मॅकरॉनने सजवले जाते.