मातीतून सोने; दरवर्षी लाखोंची कमाई | पुढारी

मातीतून सोने; दरवर्षी लाखोंची कमाई

चित्तूर : आंध— प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोने काढले जाते. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं.

पाराच्या मदतीने ते चिकणमातीचं सोन्यात रूपांतर करतात, असं गावकरी सांगतात, पण संपूर्ण प्रक्रिया अतिशय रंजक आहे. आधी चिकणमातीच्या मातीत पारा मिसळला जातो आणि त्याचे छोटे गोळे बनवून 2-3 दिवस कोरडे होण्यासाठी ठेवले जातात. मग ते केकसारखे बनवले जातात, गरम केले जातात आणि मशिनमध्ये ठेवले जातात. तिथे ही केकसारखी माती आणखी एक दिवस वाळवून थंड केली जाते. यातील सोनं आणि पारा वेगळं करण्याचे काम 2 महिला करतात.

कचर्‍यातून मिळणारं सोनं काचेच्या भांड्यात टाकलं जातं आणि ते भट्टीत भाजलं जातं. नंतर त्यात एक अ‍ॅसिड घालून गरम केलं जातं. या प्रक्रियेत तांबे-पितळ आणि इतर अशुद्धी अ‍ॅसिडमध्ये विरघळतात, त्यानंतर शुद्ध सोनं बाहेर येतं. मात्र, यातही नशिबाचा खेळ आहे. कारण अनेकदा जेवढा पारा मिसळला तेवढं सोनं मिळत नाही. कधी 1 ग्रॅम तर कधी 2 ग्रॅम मिळतात. अनेक वेळा हे देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत माती खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च खूपच जास्त आहे.

Back to top button