आता अमेरिकेच्या सैन्यालाही चंद्रामध्ये रस! | पुढारी

आता अमेरिकेच्या सैन्यालाही चंद्रामध्ये रस!

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्राकडे जगातील अनेक देशांचे लक्ष आहे. भारतानेही नुकतेच ‘चांद्रयान-3’ मोहिमेत आपले लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात यशस्वीरित्या उतरवण्यात यश मिळवलेले आहे. अमेरिका, रशियासारख्या बड्या देशांचे तर 50 वर्षांपासून चंद्राकडे लक्ष आहे. आता तर अमेरिकेच्या सैन्यालाही चंद्रामध्ये रस वाटू लागला आहे. त्यामुळे चंद्रावर लष्करही जाणार की काय असे अनेकांना वाटू लागले आहे!

अमेरिकेच्या डिफेंस अ‍ॅडव्हांस्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डार्पा) ने गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रावर लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रावर उपयुक्त ठरणार्‍या प्रगत तंत्रज्ञानाच्या शोधासाठी ‘डार्पा’ प्रयत्नशील आहे. 2021 मध्ये ‘डार्पा’ने नोवेल ऑर्बटिल मून मॅन्युफॅक्चरिंग, मटेरियल आणि मास एफिशिएंट डिझाईन (नॉम 4 डी) कार्यक्रम सुरू केला होता. गेल्या महिन्यात डार्पाने लुनार ऑपरेटिंग गाईडलाईन्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर कंसोर्टयिम किंवा ‘लॉजिक’ हा कार्यक्रम सुरू केला. चंद्रावर पायाभूत सुविधांच्या विकासाला उत्तेजन देण्यासाठी दहा वर्षांचा चांद्रभूमीवरील वास्तुकला क्षमतेचे अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा सहभाग असल्याने जगात चिंता वाढली आहे.

भू-राजकीय तणाव या चिंतेला वाढवतच आहे. चीनसारखे देश सध्या पृथ्वी व चंद्रादरम्यानच्या अंतराळात आपली महत्त्वपूर्ण उपस्थिती नोंदवण्यासाठी प्रयत्न करीत असताना अशी चिंता निर्माण होणे साहजिकच आहे.

Back to top button