जगातील सर्वात महागडे दागिने | पुढारी

जगातील सर्वात महागडे दागिने

दागिन्यांची हौस मानवाला प्राचीन काळापासूनच आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते हिर्‍या-मोत्यांच्या दागिन्यांपर्यंत अनेक प्रकारचे मौल्यवान दागिने पाहायला मिळत असतात. मात्र काही दागिने असे आहेत ज्यांच्या किमती पाहून धनकुबेरांच्याही भुवया उंचावू शकतात. अशाच काही दागिन्यांची ही माहिती…

व्हिटल्सबॅक ग्राफ डायमंड रिंग : ही अंगठी 35.56 कॅरेटचया डीप ब्ल्यू डायमंडपासून बनवण्यात आली आहे. हा हिरा ऑस्ट्रिया आणि बोवारियन क्राऊन ज्वेलरी मार्केटमध्ये पहिल्यांदाच बघण्यात आला होता. त्यानंतर 2008 मध्ये लंडन ज्वेलर लॉरेन्स ग्राफने हा हिरा 2.34 कोटी डॉलरमध्ये (त्यावेळेचे 152 कोटी रुपये) विकत घेतला. लॉरेन्स ग्राफने हा हिरा खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही बदल केले. त्यानंतर हा हिरा आणखी आकर्षक झाला आणि त्याची किंमत वाढली. त्यानंतर हा हिरा 2011 मध्ये कतारच्या शाही कुटुंबाने 8 कोटी डॉलर्समध्ये म्हणजे त्यावेळेच्या हिशेबाने 520 कोटी रुपयांना खरेदी केला.

पिंक स्टार डायमंड रिंग : 2013 पर्यंत ही अंगठी जगातील सर्वात महागडी हिर्‍याची अंगठी होती. एका लिलावात तिची सर्वाधिक बोली लागली होती. ही अंगठी 59.6 कॅरेटच्या गुलाबी हिर्‍याची आहे. हा हिरा आफ्रिकेच्या खाणीतून काढण्यात आला होता. त्यावेळी तो 132.5 कॅरेटचा होता. त्याला पैलु पाडल्यानंतर तो 59.6 कॅरेटचा झाला. त्याची किंमत 8.3 कोटी डॉलर्स ठरवण्यात आली होती. या हिर्‍यापासून बनवलेली अंगठी बरेच दिवस इसाक वूल्फ नावाच्या व्यक्तीकडे होती. त्यानंतर ती सौदी अरेबियात आणली गेली. त्यावेळी तिची किंमत 7.2 कोटी डॉलर्स म्हणजेच 468 कोटी रुपये होती.

जोए डायमंड : या हिर्‍याने बनवलेली अंगठी सर्वप्रथम सौदीच्या एका लिलावात पाहण्यात आली. ही अंगठी एका निळ्या हिर्‍याची आहे. अंगठीला 1.5 कोटी डॉलरची किंमत मिळेल, असा अंदाज होता. मात्र लिलावात अंगठीला 3.26 कोटी डॉलर्स म्हणजेच 211.9 कोटी रुपये मिळाले.

हुटन मेडिवनी जेडिएट नेकलेस : डायमंड कंपनी ‘कार्टियर’चा हा प्रसिद्ध नेकलेस आहे. या नेकलेसमध्ये 27 एम्बरलँड डायमंड जडवलेले आहेत. तसेच यामध्ये एका सुंदर माणकाचाही समावेश आहे. नेकलेसमध्ये सोने आणि प्लटिनमचा खुबीने वापर केला आहे. त्याची किंमत 2.74 कोटी डॉलर म्हणजेच 178.1 कोटी रुपये आहे.

लिंकॉमपेरेबल डायमंड नेकलेस : हा जगातील सर्वात महागडा नेकलेस आहे. तो 407.48 कॅरेटच्या हिर्‍याचा आहे. हा हिरा एका लहान मुलीला 1980 मध्ये डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मिळाला होता. त्याची किंमत 5.5 कोटी डॉलर म्हणजेच 357.5 कोटी रुपये आहे.

Back to top button