डोळ्यांच्या थ्रीडी स्कॅनवरून कळणार किडनीची स्थिती | पुढारी

डोळ्यांच्या थ्रीडी स्कॅनवरून कळणार किडनीची स्थिती

वॉशिंग्टन : एडिनबर्ग विद्यापीठातर्फे घेतल्या गेलेल्या एका अभ्यासात ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी ओटीसी तंत्राच्या माध्यमातून डोळ्यांच्या थ्रीडी फोटोच्या मदतीने विविध आजारांचे निदान केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने एका नव्या क्रांतीची ही सुरुवात मानली जाते. अनेक आजारांचे निदान अतिशय उशिरा होते. त्याचा बीमोड करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरू शकेल, असा अभ्यासकांचा होरा आहे.

एडिनबर्गच्या संशोधकांनी 204 किडनी रुग्णांवर अभ्यास करत त्यातून हा निष्कर्ष काढला आहे. यात किडनीचे प्रत्यारोपण केले गेलेल्या काही रुग्णांचाही समावेश होता. संशोधकांनी डोळ्याच्या रेटिनात होणारे बदल टिपण्यासाठी मागील पटलावरील मॅग्निफाईड छबीचा उपयोग केला, जे प्रकाशाची अनुभूती करून देतात व मेंदूला संदेशही पाठवण्याचे काम करतात. नेचर कम्युनिकेशनमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीविषयक आजाराचे ज्यावेळी निदान होते, त्यावेळी किडनीची निम्यापेक्षा अधिक कार्यक्षमेवर विपरीत परिणाम होऊन गेेलेला असतो आणि निदान उशिराने झाल्याने उपचाराला विलंब होतो. याचा संबंधित रुग्णाला फटका सोसावा लागतो. मायक्रो व्हॅस्क्युलर सर्क्युलेशन जाणून घेणे केवळ डोळ्यांच्या माध्यमातून शक्य होते. त्यामुळे डोळ्यांच्या पटलावर होणारे बदल टिपणे शक्य होते, असे या संशोधनातून आढळून आले.

Back to top button