वॉशिंग्टन : लिबियातील वाळवंटात १९३३ मध्ये विचित्र काचांचा छडा लागला होता. या काचांचे आता नव्याने विश्लेषण, अध्ययन करण्यात आले आहे. त्यामधून हे स्पष्ट झाले की हे काचेचे तुकडे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहेत. मात्र कोसळलेल्या उल्केने निर्माण झालेले विवर अद्यापही सापडलेले नाही.
'द ग्रेट सँड सी डेझर्ट' हे वाळवंट ७२ हजार चौरस किलोमीटरमध्ये फैलावले असून ते इजिप्त आणि लिबियाला जोडणारे आहे. या वाळवंटाच्या विशिष्ट भागात म्हणजेच आग्नेय लिबिया आणि नैऋत्य इजिप्तमध्ये वाळूत अशा पिवळसर रंगाच्या काचांचे अनेक तुकडे सापडतात. १९३३ मध्ये या काचांचा सर्वप्रथम छडा लागला. त्यांची वैज्ञानिक माहिती १९३३ च्या विज्ञान शोधपत्रिकेत देण्यात आली होती. ही काच सुंदर तर आहेच, पण दुर्मीळ आणि रहस्यमयही आहे. विशेष म्हणजे प्राचीन इजिप्तमधील फेरो तुतानखामेनच्या शाही मकबर्यात अशा काचेचा तुकडा बसवलेले एक पेंडंट म्हणजेच गळ्यातील पदक सापडले होते. नैसर्गिक काच जगभरात आढळते, पण लिबियामधील या काचेत सिलिकाची जी संपन्नता आहे ती अन्यत्र आढळत नाही. ही काच अनेक बाबतीत वशिष्ट्यपूर्ण आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
चंद्रावरील ज्वालामुखींमध्ये या काचेचा स्रोत असू शकतो, असे काही संशोधकांचे म्हणणे होते. काहींच्या मते माती आणि वाळू ज्यावेळी कोसळणार्या विजेच्या संपर्कात येते त्यावेळी अशी काच निर्माण होऊ शकते. काहींच्या मते ही काच म्हणजे सेडीमेंटरी किंवा हायड्रोथर्मल प्रोसेसची परिणती आहे. हवेत उल्केचा स्फोट झाल्याने अशी प्रक्रिया घडलेली असावी. या काचा जवळच्या उल्कापाताच्या विवरातून आलेल्या असाव्यात. आता अद्ययावत मायक्रोस्कोपी टेक्नॉलॉजीने याचे निश्चित उत्तर दिले आहे. जर्मनी, इजिप्त व मोरोक्कोच्या संशोधकांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले की या काचेची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागाला उल्का धडकल्याने झाली आहे.