मनोर्‍याप्रमाणे झुकतोय 900 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध टॉवर

मनोर्‍याप्रमाणे झुकतोय 900 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध टॉवर

बोलोग्ना : इटलीतील बोलोर्गंना शहरात 2 ऐतिहासिक टॉवर डौलाने उभे आहेत. असनेली व गॅरीसेंडा अशी या दोन टॉवरची नावे आहेत. मात्र, यातील गॅरीसेंडा टॉवर 4 डिग्रीपर्यंत झुकला आहे. इटलीतील सर्वात प्रसिद्ध पिसाचा झुकता मनोरा 3.9 डिग्रीपर्यंत आहे. यामुळे 900 वर्षे जुने असलेले टॉवर जमीनदोस्त होण्याचा धोका वाढला आहे. एकवेळ पिसाचा मनोरा 5.5 डिग्रीपर्यंत झुकला होता, पण दुरुस्तीनंतर त्याचे हे झुकणे 3.9 डिग्रीपर्यंत कमी करण्यात आले होते.

गॅरीसेंडा टॉवरबाबत आता तज्ज्ञांना तो कोसळण्याची भीती सतावत आहे. नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निकालात काढण्यासाठी या टॉवर परिसरातील रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या टॉवरचा पाया कमकुवत होत चालले असून धोका वाढत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

याचवेळी प्रशासनाने हा ऐतिहासिक टॉवर जमीनदोस्त होऊ नये, या द़ृष्टीने दुरुस्ती योजना जाहीर केली आहे. इटालियन कल्चर अंडर सेक्रेटरी लुसिया बोर्गोनजोनीने ही स्थिती चिंताजनक असल्याचे कबूल केले. हा धोका वाढला, यामागे नगर परिषद दोषी असल्याचे त्यांनी नमूद केले. टॉवर मजबूत करण्यासाठी 4.3 दशलक्ष डॉलर्स रकमेची तरतूद करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या ऐतिहासिक टॉवर्सचा इतिहास रंजक आहे. आश्चर्य म्हणजे या दोन्ही टॉवर्सची निर्मिती दोन कुटुंबातील शत्रुत्वामुळे झाली होती. गॅरीसेंडा टॉवरची उभारणी 1109 ते 1119 या दरम्यान एकाने केली तर त्याच कुटुंबातील दुसर्‍याने दुसरा टॉवर उभा केला. आपली संपत्ती व ताकद दर्शवण्यासाठी हे टॉवर उभे केले गेले, असे मानले जाते. गॅरीसेंडा टॉवरची उंची 157 फूट इतकी आहे तर असिनेली टॉवर त्यापेक्षाही दुपटीने उंच म्हणजे 318 फूट उंच आहे. गॅरीसेंडा टॉवरची उंची सध्यापेक्षा अधिक होती. फक्त समतोल नसल्याने तो पूर्ण जमीनदोस्त होणे टाळावे, यासाठी त्याचा 10 मीटर्सचा भाग 13 व्या शतकातच कापून टाकण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news