आठ फुटांचा प्राचीन बहुपाद जीव पडद्यावर झाला जिवंत!
वॉशिंग्टन : प्रागैतिहासिक काळात आपल्या कल्पनेतही येणार नाही असे काही जीवजंतू होते. त्यामध्येच 'आथ्रोप्लुरा' नावाच्या बहुपाद जीवाचा समावेश होतो. सध्याच्या काळातील गोम जशी दिसते तसा, पण आकाराने भलताच मोठा असा हा जीव होता. एखाद्या कारइतक्या आकाराचा हा जीव आता पडद्यावर जिवंत झाला आहे. 'लाईफ ऑन अवर प्लॅनेट' या कार्यक्रमात असा जीव साकारला असून, तो कसा वावरत होता हे दर्शवले आहे. या जीवाची लांबी 8.5 फूट व रुंदी 1.6 फूट होती.
हा पृथ्वीवर वावरलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा बहुपाद प्राणी आहे. 170 वर्षांपूर्वी आथ्रोप्लुराचे पहिले जीवाश्म संशोधकांना सापडले होते. युरोपमध्ये विशेषतः सध्याच्या इंग्लंडच्या क्षेत्रात आणि उत्तर अमेरिका खंडात हे प्राणी 35 कोटी 90 लाख ते 29 कोटी 90 लाख वर्षांपूर्वी वावरत होते.
2018 मध्ये त्याचे जवळजवळ संपूर्ण अवस्थेतील जीवाश्म सापडले व त्यावरून त्याचे स्वरूप कसे होते, याचा संशोधकांना अंदाज आला. त्याची शरीररचना कशी होती हे समजल्याने त्या रूपाची पडद्यावर पुनर्निर्मिती करण्यात आली. 'लाईफ ऑन अवर प्लॅनेट'च्या टीमने हे काम तडीस नेले. त्यासाठी लिसेस्टर युनिव्हर्सिटी, ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

