

भोपाळ : मागे एकदा एका महिलेच्या पायाला वेटोळे घालून एक नाग बसला होता, असे वृत्त आले होते. ही महिला न हलता दोन तास अशा स्थितीत बसली होती व नंतर तिची सुटका झाली! अंथरुणाजवळ नाग किंवा अन्य सर्प येण्याची अनेक उदाहरणे आहेत. मध्य प्रदेशात असाच एक प्रकार घडला. पती झोपेत असताना पत्नीला एक भलामोठा नाग त्याच्या उशीमागे फणा काढून बसलेला दिसला. त्यावेळी तिने प्रसंगावधान राखून पतीचे पाय धरून त्याला खाली खेचले!
सागरच्या पाटकुई बरारू गावात एका डॉक्टरांच्या फार्म हाऊसमध्ये सुनील नावाचा चौकीदार आपल्या कुटुंबासह राहतो. तो जमिनीवर झोपला होता आणि त्याच्या उशाजवळ 6 फूट लांब नाग फणा पसरून बसला होता. तितक्यात सुरक्षारक्षकाची बायको त्याला जेवायला बोलवायला आली आणि तिने पतीच्या डोक्याजवळ नाग पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने झोपलेल्या पतीचे पाय धरून त्याला खाली खेचले आणि मग त्याला उठवले.
तिने उशीच्या मागचे दृश्य पतीला दाखवले तेव्हा त्यालाही धक्काच बसला. फार्म हाऊसचे मालक डॉ. यशपाल यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी एका सर्पमित्राला फोन केला. हा सर्पमित्र गावात पोहोचला आणि फार्म हाऊसवरील चौकीदाराच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याला उशीच्या मागे हा नाग बसलेला दिसला. मोठ्या परिश्रमानंतर त्याने या नागाला ताब्यात घेतले आणि नंतर त्याला एका बरणीत भरुन जंगलात सोडले. पत्नीच्या प्रसंगावधानाने या चौकीदाराचा प्राण वाचला!