आकाशातून खाली कोसळली; मुंग्यांमुळे बचावली! | पुढारी

आकाशातून खाली कोसळली; मुंग्यांमुळे बचावली!

वॉशिंग्टन : कुणामुळे जीव वाचेल हे काही सांगता येत नाही. सिंहाचा जीव वाचवण्यासाठी उंदराची मदत झाली होती, अशी एक गोष्ट इसापनितीत आहे. माणसाचा जीव मुंग्यांमुळेही वाचू शकतो हे कदाचित आपल्या कल्पनेतही येणार नाही; पण असे घडलेले आहे. स्कायडायव्हिंग करीत असताना ऐनवेळी पॅराशूट न उघडल्याने एक महिला तब्बल 14,500 फूट खाली कोसळली. मात्र, मुंग्यांमुळे तिचे प्राण वाचले!

या महिलेचे नाव आहे जोन मरे. 78 वर्षांच्या जोन मरे या अमेरिकेतील माजी स्कायडायव्हर आहेत. त्यांच्यासाठी चक्क मुंग्याच देवदूत बनून आल्या आणि त्यांचा जीव वाचला. ही घटना घडली 25 सप्टेंबर 1999 या दिवशी. या घटनेपूर्वी त्यांनी 35 वेळा विमानातून उडी घेऊन स्कायडायव्हिंग केले होते. मात्र, दक्षिण कॅरोलिना येथील चेस्टर कौंटीची 36 वी उडी त्यांच्यासाठी घातक ठरली. या उडीवेळी त्यांचे पॅराशूट उघडलेच नाही. मात्र, धैर्य राखत त्यांनी राखीव पॅराशूट उघडण्यात यश मिळवले. दुर्दैवाने या राखीव पॅराशूटनेही त्यांना साथ दिली नाही आणि त्या ताशी 80 मैल वेगाने खाली कोसळू लागल्या.

‘देव तारी त्याला कोण मारी’ असे आपल्याकडे म्हटले जाते, त्याची प्रचिती यावेळी त्यांना आली. इतक्या उंचीवरून कोसळूनही त्या चमत्कारिकरीत्या बचावल्या. त्या एका मोठ्या वारूळावर पडल्या. ज्यावेळी त्यांना शुद्ध आली त्यावेळी त्या श्वास घेत होत्या; पण हालचाल करू शकत नव्हत्या. यादरम्यान वारूळातील मुंग्यांनी त्यांना दोनशेहून अधिक वेळा दंश केला होता. या दंशानेच त्यांचा जीव वाचवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या मतानुसार मुंग्यांच्या विषारी डंखाने त्यांच्या हृदयाला धक्का बसला, त्यामुळेच हृदयाचे ठोके थांबले नाहीत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर दुखापतींवर उपचार करण्यासाठी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन आठवडे त्या कोमातही होत्या; पण पुढे त्या बर्‍या झाल्या!

Back to top button