पक्ष्याच्या धडकेने 750 कोटींच्या फायटर जेटचे झाले भंगार! | पुढारी

पक्ष्याच्या धडकेने 750 कोटींच्या फायटर जेटचे झाले भंगार!

सेऊल : या अस्थिर दुनियेत कधी रंकाचा राव होईल आणि रावाचा रंक होईल हे सांगता येत नाही. तसेच एखादी बहुमूल्य वस्तू क्षणार्धात कवडीमोलाची बनू शकते. जगातील सर्वात महागडे आणि आधुनिक लढाऊ विमान मानले जाणारे ‘एफ-35 स्टील्थ फायटर जेट’ केवळ एका पक्ष्याच्या धडकेने निकामी झाले व त्याची अवस्था भंगारातील वस्तूसारखी झाली! दक्षिण कोरियन हवाई दलाने गतवर्षी पक्ष्याशी धडक झाल्यानंतर या ‘एफ-35 ए’ विमानाला आता सेवेतून निवृत्त केले आहे.

जानेवारी 2022 मध्ये एका प्रशिक्षणादरम्यान, एक पक्षी धडकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या ‘एफ-35 ए’च्या पायलटला बेली लँडिंग करावे लागले होते. त्यामुळे या विमानात बिघाड झाला होता. त्यावेळी दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने सांगितले होते की ‘एफ 35’ विमानाला एका गरूडाची धडक बसली होती. या धडकेमुळे विमानातील हायड्रोलिक डक्ट आणि वीजपुरवठा करणार्‍या केबलचे नुकसान झाले होते. त्यामुळे लँडिंग गिअर चालवण्यात अडथळे आले. अखेर वैमानिकाला बेली लँडिंग करावे लागले.

सुदैवाने या दुर्घटनेत वैमानिकाचा जीव वाचला! मात्र विमानाच्या दुरुस्तीचा खर्च ऐकून दक्षिण कोरियाच्या हवाई दलाला धक्काच बसला. या विमानाची निर्मिती करणार्‍या लॉकहीड मार्टिन कंपनीने विमानातील 300 महागड्या आणि आवश्यक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. ही रक्कम विमानाची खरेदी किंमत असलेल्या 750 कोटी रुपयांहून अधिक निघाली. हा खर्च पाहून हवाई दलाने या विमानालाच निवृत्त करण्याचे ठरवले. सध्या दक्षिण कोरियाकडे 40 एफ-35 ए विमानांचा ताफा आहे.

Back to top button