नव्या पिग्मी स्क्विड प्रजातींना जपानी नावे | पुढारी

नव्या पिग्मी स्क्विड प्रजातींना जपानी नावे

टोकियो : एका जपानी बेटाजवळील समुद्रात संशोधकांनी पिग्मी स्क्विडच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. या चिमुकल्या स्क्विड प्रजातींना आता जपानी नावे देण्यात आली आहेत. हे सेफॅलोपॉडस् एखाद्या पेपर क्लिपपेक्षाही लहान आकाराचे आहेत. ओकिनावामधील समुद्रात हे जीव प्रवाळरांगांच्या तळाशी तसेच सागरी गवताच्या मैदानांमध्ये आढळतात. त्यांना आता जपानी लोककथा आणि मार्शलआर्टशी संबंधित कथांमधील नावे देण्यात आली आहेत.

याबाबतची माहिती ‘मरीन बायोलॉजी’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. युक्युआन पिग्मी स्क्विडला (आयडीओसेपियस किजीमुना) ‘किजीमुना’ हे नाव ओकिनावातील लोककथेमध्ये असलेल्या एका काल्पनिक पात्रापासून मिळाले आहे. या कथेत किजीमुना हा जीव वडाच्या झाडावर राहतो आणि तो हलक्या लाल रंगाचा असतो असे वर्णन आहे. त्याच्याप्रमाणेच हा स्क्विडही हलक्या लाल रंगाचा असतो व तो किनार्‍याजवळच्या सागरी गवतांच्या जंगलात राहतो. हे गवत समुद्राच्या पृष्ठभागापासून 6.6 फूट खोलीवर असतात. या प्रजातीचा शोध 2018 मध्येच घेण्यात आला होता. त्यावेळेपासून त्याचा अभ्यास सुरू होता.

दुसर्‍या ‘हनानच्या पिग्मी स्क्विड’ला (कोडामा जुजुत्सु) अंडरवॉटर फोटोग्राफर ब्रँडन रियान हनान यांचे नाव देण्यात आले होते. त्यांना हा जीव प्रवाळांमध्ये दिसला होता. ही प्रजाती ‘कोडामा’ या संपूर्णपणे नव्याच कुळातील (जीनस) आहे. हे ‘कोडामा’ नावही जपानमधील काल्पनिक कथेतील भुतावरून देण्यात आले आहे. हे भूत संपन्न अशा जंगलात राहते अशी कल्पना आहे. ‘कोडामा’ स्क्विडचे अस्तित्वही अशाच संपन्न जंगलाचे अस्तित्व दर्शवते. ‘जुजुत्सु’ हा शब्द मार्शल आर्टमधील आहे.

Back to top button