वॉशिंग्टन : येत्या काही दिवसांमध्ये दोन लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहेत. 3 व 4 डिसेंबरला पृथ्वीजवळून जाणार्या या लघुग्रहांपासून आपल्या ग्रहाला कोणताही धोका नसल्याचे 'नासा'ने स्पष्ट केले आहे. दोन्ही लघुग्रह तुलनेने आकारात मोठे आहेत.
3 डिसेंबरला '1998 डब्ल्यूबी2' हा लघुग्रह ताशी 51,116 किलोमीटर वेगाने पृथ्वीजवळून जाईल. त्याचा आकार 470 फूट आहे. तो 3 डिसेंबरला पृथ्वीपासून 42 लाख 10 हजार किलोमीटर अंतरावर असेल. एखाद्या इमारतीइतक्या मोठ्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून सुरक्षित अंतरावरून जाईल. 'नासा'ने आणखी एक लघुग्रह '2013 व्हीएक्स 4' बाबतही माहिती दिली. हा लघुग्रह 4 डिसेंबरला पृथ्वीजवळून जाईल. त्याचा आकार 190 फूट आहे. तो पृथ्वीपासून 19 लाख 60 हजार किलोमीटर इतक्या तुलनेने कमी अंतरावरून जाईल.
सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजच्या माहितीनुसार हा लघुग्रह ताशी 23,567 किलोमीटर वेगाने येत आहे. अंतराळात अशा अनेक अवकाशीय शिळा असतात ज्या वेळोवेळी पृथ्वीजवळून जातात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान अशा लघुग्रहांचा एक पट्टाच आहे, ज्याला 'अॅस्टेरॉईड बेल्ट' असेच म्हटले जाते. आपल्या सौरमालिकेच्या टोकाला असलेल्या क्यूपर बेल्टमध्येही लघुग्रह आहेत. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरसह अनेक प्रजातींचा र्हास झाला होता.