आयटाना : ‘एआय’चे मायाजाल… आभासी मॉडेल! | पुढारी

आयटाना : ‘एआय’चे मायाजाल... आभासी मॉडेल!

न्यूयॉर्क : ‘माया’ म्हणजे ‘जी नाही ती’ भ्रामक, मायावी द़ृश्ये निर्माण करणार्‍या अनेक गोष्टी या जगात प्राचीन काळापासूनच होत्या. आता त्यामध्ये ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची भर पडली आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक प्रकारची माया तयार केलेली हल्ली पाहायला मिळत आहे. सोबतच्या छायाचित्रांमध्ये दिसणार्‍या या तरुणीला पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल; पण ‘दिसतं तसं नसतं’ म्हणतात त्याप्रमाणे या चेहर्‍यामागील सत्य समजल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातील! फोटोत दिसणारी ही तरुणी साधीसुधी नसून फारच खास आहे. तिचे नाव आहे ‘आयटाना’.

‘आयटाना’ ही स्पेनमधील पहिली ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशिएल इंटेलिजन्स’ मॉडेल आहे. तिला पाहताच अनेकांची अवस्था ‘हुस्न है, जुनुन है, ये कैसी माया है’ अशी होऊ शकते. मात्र, ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसून केवळ एक ‘एआय’ मॉडेल आहे. प्रसिद्ध डिझायनर रुबेन क्रुझने ‘आयटाना’ची निर्मिती केली आहे. आपल्या ‘क्लूलेस’ नावाच्या एजन्सीच्या माध्यमातून रुबेनने ‘आयटाना’ची निर्मिती केली. ‘चांगलं आयुष्य जगण्याच्या उद्देशाने आम्ही ‘आयटाना’ची निर्मिती केली आहे. आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, अशी यामागील संकल्पना आहे,’असं रुबेन म्हणाला. अनेक महिने ‘क्लूलेस’ कंपनी ‘आयटाना’संदर्भातील प्रयोग करत होती. अखेर त्यांना बर्‍याच महिन्यानंतर एक सुंदर एआय मॉडेल बनवण्यात यश आले.

‘आयटाना’ ही केवळ डिजिटल माध्यमामध्ये अस्तित्वात असली तरी तिची महिन्याची कमाई 3 ते 10 हजार यूरो इतकी आहे. भारतीय चलनानुसार ‘आयटाना’ची सरासरी मासिक कमाई 2 लाख 73 हजार रुपये आहे. तिने एका महिन्यात सर्वाधिक 9 लाख 13 हजारांची कमाई केलेली आहे. ‘आयटाना’ ही स्पेनमधील सर्वात मोठ्या स्पोर्टस् कंपनीची ओळख बनली आहे. या कंपनीचे नाव ‘बिग’ असे आहे. मागील काही महिन्यांमध्ये ‘आयटाना’चे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या 1 लाख 21 हजारांहून अधिक झाली आहे. इतर माध्यमांवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.

Back to top button