मॉस्को : प्रयोगासाठी अंतराळात काही प्राण्यांनाही पाठवण्यात येत असते. अगदी लायका नावाच्या श्वान मादीपासून ते माकडापर्यंत अनेक प्राणी अंतराळात पाठवलेले आहेत. मात्र, अंतराळात एखाद्या जीवाने पिल्लांना जन्म देण्याचे उदाहरण केवळ एकच आहे. एका झुरळाने अंतराळात 33 पिल्लांना जन्म दिला होता!
अंतराळ हे अजूनही आपल्या शास्त्रज्ञासाठी गूढ बनून राहिले आहे. काहींची उत्तरं सापडली असली तरी काही प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अंतराळात सजीव जन्म घेऊ शकतात का? अंतराळात सजीव जगू शकतात का? याचे उत्तर शोधण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. या जीवाने एक दोन नव्हे तर तब्बल 33 पिल्लांना जन्म दिला. 2007 मध्ये रशियाच्या वैज्ञानिकांनी होप नावाच्या एका झुरळाला फोटोन-एम-बायो-सॅटेलाईटच्या मदतीने अंतराळात पाठवले आणि तिथेच झुरळ पिल्लांना जन्म देण्याची वाट पाहू लागले. अंतराळात 12 दिवसांनंतर या झुरळाने 33 पिल्लांना जन्म दिला. विशेष म्हणजे, जन्मानंतर झुरळाची सगळी पिल्ली व्यवस्थित खात-पीतदेखील होते. सामान्यतः पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर झुरळाच्या पाठीवर हे पारदर्शी कवच असते. त्यानंतर कालांतराने त्यांच्या वयानुसार ते सोनेरी व्हायला लागते. मात्र, अंतराळात जन्म घेणार्या झुरळांसोबत असं झालं नाही. त्यांच्या पाठीवरील कवच जन्मतःच काळे होते आणि कालांतराने ते अधिकच काळे होत गेले. वैज्ञानिकांना जेव्हा अंतराळात जन्म घेतलेल्या झुरळांच्या शरीरावर हे विशेष बदल जाणवले. तेव्हा त्यांनी त्यावर संधोधन करण्यास सुरुवात केली. तेव्हा लक्षात आले की त्यांच्या शरीरातील हा बदल गुरुत्वाकर्षणामुळे झाला आहे. म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे सजीवांच्या शरीरात हा बदल झाला. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते त्यामुळे पृथ्वीवर ज्याप्रमाणे गोष्टी घडतात तशा अवकाशात घडत नाहीत.