पाकिस्तानात भीक मागून झाली श्रीमंत, आता राहते मलेशियात! | पुढारी

पाकिस्तानात भीक मागून झाली श्रीमंत, आता राहते मलेशियात!

क्वालालंपूर : रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण, यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी तरुणीचा असल्याचे सांगितले जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका चांगल्या घरातील एक सुंदर कपडे घातलेली मुलगी पाहू शकता, जी तिने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करताच तुम्ही थक्क व्हाल. ही तरुणी पाकिस्तानात खोट्या कहाण्या सांगून भीक मागत असे. या भीकेतून तिने इतके पैसे कमावले की, आता ती मलेशियात घर-गाडी घेऊन मजेत राहत आहे!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी नम्रपणे बसलेली आहे. ती तिचे नाव लायबा असल्याचे सांगत आहे. एकूण 1 मिनिट 25 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मुलगी अभिमानाने सांगत आहे की, तिने गेल्या पाच वर्षांत भीक मागून खूप पैसे कमावले आहेत. मला माझी ओळख लपवायची नाही आणि ती लपवता येत नसल्याने मी सत्य बोलत असल्याचे लायबा सांगते.

ती लोकांना खोट्या गोष्टी सांगून पैसे मागत असे आणि लोक जास्त चौकशी न करता पैसे द्यायचे, असेही ती आनंदाने सांगत आहे. लायबा नावाची पाकिस्तानी तरुणी सध्या मलेशियामध्ये राहते. पाकिस्तान ते मलेशिया ती फ्लाईटने प्रवास करते. तिच्याकडे 2 फ्लॅट, कार आहे. ती पाकिस्तानात नातेवाईकांना भेटायला आली होती. भीक मागून आपण श्रीमंत झाल्याचे ती सांगते. घरी कोणी आजारी आहे, उपचाराला पैसे नाहीत, असे सांगून पैसे मिळवायचे, असेही ती मुलाखतीत सांगते!

Back to top button