बुध ग्रहावर मिठाच्या ग्लेशियर्सचा छडा! | पुढारी

बुध ग्रहावर मिठाच्या ग्लेशियर्सचा छडा!

वॉशिंग्टन : सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह म्हणजे बुध. या उष्ण, चिमुकल्या ग्रहावर जीवसृष्टीचे अस्तित्व असेल, अशी आपण कल्पनाही करणार नाही. मात्र, या ग्रहावर जीवसृष्टी असू शकते, असे संकेत देणारे संशोधन झाले आहे. या ग्रहावर चक्क मिठाच्या ग्लेशियर्सचा छडा लावण्यात आला आहे. अमेरिकेतील प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

बुधावरील मिठाचे हे ग्लेशियर्स पृथ्वीवरील अशा ग्लेशियर्सपेक्षा वेगळे आहेत. खोल अशा क्षारसंपन्न स्तरातून हे ग्लेशियर बुधावर निर्माण झालेले आहेत. मिठाच्या प्रवाहानेच त्यांची निर्मिती केल्याचे संशोधकांनी सांगितले. असे ग्लेशियर अनेक ग्रहांवर जीवसृष्टीची आशा निर्माण करीत असतात. सूर्याच्या अतिशय जवळ असल्याने बुधावरील दिवसाचे कमाल तापमान 430 अंश सेल्सिअसपर्यंत जात असते.

रात्रीच्या वेळी ते घसरून उणे 180 पर्यंत खाली जाते. या ग्रहाला वातावरण नाही, त्यामुळे ग्रहावर येणारी उष्णता रोखली जात नाही. त्यामुळे तिथे जीवसृष्टीची कल्पना करणेही कठीण असले, तरी अशी मिठाच्या ग्लेशियर्सचे अस्तित्व कुतूहल वाढवणारे आहे. सौरमंडळात अतिशय उष्ण व अतिशय थंड स्थितीतही ग्लेशियर बनू शकतात, हे यावरून दिसून आले.

Back to top button