नारळही फोडू शकणारा दीड फूट लांबीचा उंदीर | पुढारी

नारळही फोडू शकणारा दीड फूट लांबीचा उंदीर

लंडन : तब्बल दीड फूट लांब होऊ शकणार्‍या वांगुनू जायंट रॅट या महाकाय उंदराला कॅमेर्‍यात टिपण्यात संशोधकांना प्रथमच यश आले आहे. सहा वर्षांपूर्वी असा एक उंदीर झाडावरून खाली पडला होता. या प्रजातीचा केवळ हाच नमुना संशोधकांकडे होता. आता सोलोमन आयलंडवर असा उंदीर कॅमेर्‍यात टिपण्यात यश आले. असा उंदीर आपल्या तीक्ष्ण व मजबूत दातांनी चक्क नारळही फोडू शकतो.

संशोधकांनी लावलेल्या कॅमेरा ट्रॅप्समध्ये हा उंदीर सापडला. सामान्य उंदरापेक्षा दुपटीने मोठ्या आकाराच्या असलेल्या अशा चार उंदरांना कॅमेर्‍यांनी सोलोमन आयलंडवरील जंगलात टिपून घेतले. हे बेट प्रशांत (पॅसिफिक) महासागरात ऑस्ट्रेलियापासून ईशान्येकडे आहे.

वांगुनू जायंट रॅटस्ना वैज्ञानिक भाषेत ‘उरोमिस विका’ असे नाव आहे. ते त्यांचे महाकाय शरीर, लांब शेपूट आणि अतिशय आखूड कान यासाठी ओळखले जातात. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न युनिव्हर्सिटीतील संशोधक टायरोनी लॅव्हेरी यांनी सांगितले की, या अतिशय कमी माहिती असलेल्या प्रजातीच्या प्रतिमा मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यास मदत मिळेल.

Back to top button