क्लार्कच्या एका चुकीमुळे ‘तो’ झाला कोट्यधीश! | पुढारी

क्लार्कच्या एका चुकीमुळे ‘तो’ झाला कोट्यधीश!

वॉशिंग्टन : कधी कधी काही लोकांच्या नशिबी ‘अचानक घबाडलाभ’ होण्याचा योग असतो! औटघटकेसाठी का होईना, अशा लोकांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा होत असतात. अर्थात त्यामागे कुणाची तरी चूक असते व ती नंतर दुरुस्त केली जाते. आता असाच एक प्रकार अमेरिकेत झाला आहे. मात्र, यावेळी ती चूक दुरुस्त होणारी नव्हती व ज्याला लाभ मिळाला तो आयुष्यभरासाठी होता!

अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणार्‍या साठ वर्षांच्या मायकल सोपेजस्टल यांच्याबाबत ही चक्रावणारी घटना घडली आहे. त्यांनी लॉटरीचे तिकीट खरेदी केले. आपल्याला इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागेल याची त्यांना जराही खात्री नव्हती; पण क्लार्कच्या एका चुकीने त्यांचे नशीब फळफळले आहे. नेमकं काय घडलं हे मायकल यांनी सांगितले आहे. मायकल यांनी म्हटलं आहे की, ते नेहमीच त्यांच्या मिशिगन येथील आवडीच्या रेस्तराँमध्ये महिन्यातून एकदा जातात.

तिथे गेल्यावर ते ‘लकी फॉर लाईफ’ या लॉटरीचे तिकीट खरेदी करतात. 17 सप्टेंबर रोजी गोलो गॅस स्टेशनसाठी लॉटरी विक्रेत्याने चुकून एकाच ड्रॉसाठी 10 लाईन असलेले तिकीट प्रिंट करून त्यांना दिले. असं असतानाही त्यांनी त्या विक्रेत्याकडून ते लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते ज्या लॉटरीला क्लार्कची चूक समजत होते, त्यामुळेच त्यांचे नशीब चमकले आहे. मायकल यांनी तिकीट चेक केल्यानंतर त्यांना समजले की, आयुष्यभरासाठी त्यांना 25,000 डॉलरची लॉटरी लागली आहे. ही रक्कम बघूनच ते हैराण झाले.

क्लार्कच्या एका चुकीमुळं ते इतकी मोठी लॉटरीची किंमत जिंकू शकले. मिळालेल्या माहितीनुसार, मायकल लगेचच लॉटरीच्या कार्यालयात रक्कम घेण्यासाठी पोहोचले. तिथे त्यांनी प्रति वर्षी 25,000 डॉलर घेण्याऐवजी एकदाच 390,000 डॉलर (3.25 कोटी) घेण्याचा पर्याय स्वीकारला. लॉटरीच्या पैशांचा वापर ते प्रवासासाठी करणार आहेत. तसेच उरलेले पैसे बचत करण्याची योजना ते आखत आहेत.

Back to top button