जगातील सर्वात लहान अब्जाधीश | पुढारी

जगातील सर्वात लहान अब्जाधीश

रोम : काही लोक जन्माला येत असतानाच तोंडात चांदीचा नव्हे, तर सोन्याचा चमचा घेऊन येत असतात. अशा धनकुबेरांना वारशाने मिळणारी संपत्ती लोकांना थक्क करीत असते. आता जगातील सर्वात लहान वयाचा अब्जाधीश असलेला एक किशोरवयीन मुलगाही असाच चर्चेत आलेला आहे. इटलीतील या तरुणाचे नाव आहे क्लेमेंटे डेल वेचियो. अवघ्या 19 व्या वर्षीच तो जगातील सर्वात लहान वयाचा अब्जाधीश बनला आहे.

क्लेमेंटेचे वडील लियोनार्डो डेल वेचियो हे जगातील सर्वात मोठी चष्मा-गॉगल्स कंपनी ‘एसिलोरलग्जोटिका’चे चेअरमन होते. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची एकूण संपत्ती 25.5 अब्ज डॉलर्सची होती. ती त्यांची पत्नी व सहा मुलांना वारशाने मिळाली. क्लेमेंटेला त्याच्या पित्याच्या लक्झमबर्ग येथील कंपनी ‘डेल्फिन’मध्ये 12.5 टक्के हिस्सेदारी मिळाली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका रिपोर्टनुसार क्लेमेंटेची एकूण संपत्ती 4 अब्ज डॉलर्स आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे. त्याला विज्ञान व तंत्रज्ञान विषयात रस आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेऊन याच क्षेत्रात करिअर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. अफाट संपत्तीचा मालक असूनही, त्याचे पाय जमिनीवरच आहेत, हे विशेष! त्याला प्रसिद्धीच्या झोतात येणे आवडत नाही. इटलीत त्याच्या नावे अनेक लक्झरी प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये लेक कॉमो येथील एक व्हिला आणि मिलानमधील एका अपार्टमेंटचा समावेश आहे.

Back to top button