प्रशांत महासागरात दीड किलोमीटर उंचीचा पर्वत

प्रशांत महासागरात दीड किलोमीटर उंचीचा पर्वत

वॉशिंग्टन : जमिनीवर जसे पर्वत, दर्‍या वगैरे भूरचना पाहायला मिळतात, तशाच समुद्रतळाशीही असतात. आता संशोधकांनी जगातील सर्वात मोठा महासागर असलेल्या प्रशांत किंवा पॅसिफिक महासागरात अतिशय उंच अशा पर्वताचा शोध घेतला आहे. हा पर्वत तब्बल 1.5 किलोमीटर उंचीचा असून त्याने 8 चौरस किलोमीटरची जागा व्यापलेली आहे. जगातील सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा'ही यापुढे खुजी ठरेल इतका हा पर्वत उंच आहे.

हा पर्वत आजपर्यंत मानवाला अज्ञातच होता. 'बुर्ज खलिफा' पेक्षा दुप्पट उंच असलेल्या या पर्वताला 'सीमाऊंट' म्हटले जाते. तो समुद्रात 7900 फूट खोलीवर आहे. श्मिट ओशन इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका अभियानात ग्वाटेमालाच्या विशेष आर्थिक क्षेत्रापासून सुमारे 135 किलोमीटरवर महासागरात हा पर्वत आढळून आला. अमेरिकेच्या राष्ट्रीय समुद्री आणि हवामान प्रशासनाने या पर्वताची पुष्टी केली आहे. महासागरांच्या तळाशी अनेक सीमाऊंट आहेत जे अद्यापही मानवाला अज्ञातच आहेत.

एका अनुमानानुसार महासागरात एक लाखापेक्षाही अधिक सीमाऊंट असू शकतात, जे किमान एक हजार मीटर उंचीचे आहेत. या सीमाऊंटला शोधण्यासाठी शोध जहाज 'फाल्कोर'वर 'ईएम 124 मल्टिबीम इको साऊंडर'चा वापर करण्यात आला. या उपकरणाच्या वापराने समुद्रतळाचे हाय रिझोल्यूशन मॅपिंग होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news