

लंडन : मध्यमवर्गातील व्यक्ती आयुष्यात बर्याच खडतर परिस्थितीतून मार्गोत्क्रमण करत थोडीफार जमीन खरेदी करते, त्यावर घर उभारते आणि आपल्या परिवारासह त्यात आयुष्य व्यतित करते. एक-दीड गुंठे जमीन घेणेदेखील काहींच्या आवाक्यापलीकडचे असते आणि यासाठी त्यांना बराच आटापिटा करावा लागतो. पण, याचवेळी जगात एक व्यक्ती अशीही आहे, ज्यांच्या नावावर पूर्ण जगभरातील थोडीथोडकी नव्हे, तर चक्क 16 टक्के भूभाग आहे. जगातील 16 टक्के क्षेत्र या व्यक्तिमत्त्वाच्या नावावर असून, या क्षेत्राबद्दल ते काहीही निर्णय घेऊ शकतात आणि ती व्यक्ती म्हणजे ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स!
इनसायडर आणि काही बिझनेस वेबसाईटनी केलेल्या दाव्यानुसार, इंग्लंडमधील रॉयल फॅमिलीकडे जगातील सर्वाधिक जमीन नावावर आहे. ही सर्व जमीन यापूर्वी राणी एलिझाबेथच्या नावावर होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांच्या खात्यावर ही जमीन हस्तांतरित करण्यात आली.
प्रिन्स चार्ल्सच्या नावावर जगभरातील थोडीथोडकी नव्हे तर चक्क 660 कोटी एकर जागा नोंद आहे आणि जोवर ते राजे आहेत, तोवर या जमिनीची मालकी त्यांच्याकडे असेल. या सर्व जमिनी ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, कॅनडा आदी देशांमध्ये आहेत. यासह जगभरातील 16 टक्के जमीन एकट्या प्रिन्स चार्ल्सच्या नावावर आहे.
क्राऊन इस्टेट नावाची एक संस्था या सर्व जमिनींची देखभाल करते. चार्ल्स यांनी कार्यभार सांभाळला, त्यावेळी ते 3 लाख कोटी रुपये संपत्तीचे हक्कदार होते, हेदेखील येथे उल्लेखनीय आहे.