पायी चालण्यासाठी सर्वात लांब रस्ता | पुढारी

पायी चालण्यासाठी सर्वात लांब रस्ता

मॉस्को : ‘चरैवेती चरैवेती’ असे आपल्याकडे म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘चालत रहा, चालत रहा’. चालणार्‍या व्यक्तीचे भाग्यही चालत राहते आणि बसून राहणार्‍या व्यक्तीचे भाग्यही बसकण मारते, असे म्हटले जाते. अनेकांना प्रवासाची, भटकंतीची आवड असते. अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने पायी चालतही प्रवास करीत असतात. आपल्याकडे विठुरायाच्या ओढीने पंढरीची वारी करणारे वारकरी असोत किंवा नर्मदा परिक्रमा करणारे भाविक असोत, त्यांची ही पायी चालत जाण्याची तपश्चर्या थक्क करीत असते. मात्र, पायी चालत जगाचा प्रवास करायचा म्हटलं तर सर्वात लांब रस्ता कोणता ठरेल हे तुम्हाला माहिती आहे का? हा रस्ता दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनपासून रशियाच्या मगदानपर्यंतचा आहे. या रस्त्यावरून जात असताना सतरा देश लागतात.

प्रवासासाठी एकही रुपया खर्च न करता, कोणत्याही रेल्वे, बसचं तिकीट न काढता पायी पायी जात तुम्ही चक्क 17 देश ओलांडू शकता. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन ते रशियाच्या मगदानपर्यंतचे हे अंतर म्हणजे जगातील पायी प्रवासासाठीचा सर्वात लांबलचक रस्ता. ही वाट चालत असताना तुम्ही अनेक रस्ते आणि पूल ओलांडता. दक्षिण आफ्रिकेच्या सुएझ कालव्यापासून ही वाट पुढे जाते. ज्यानंतर तुर्की आणि मध्य आशिया ओलांडून सैबेरिया पार करत मग मगदानमध्ये पोहोचता.

‘ब्रिलियंटमॅप्स’नुसार हे अंतर 22,387 किलोमीटर इतकं आहे. 17 देश, सहा टाईम झोन, सातत्यानं बदलणारे तीन ॠतू आणि हवामानासह असंख्य भौगोलिक बदल तुम्ही या प्रवासादरम्यान अनुभवू शकता. दर दिवशी ओढाताण न करता, किमान 8 तासांसाठी चाललं तर तुम्ही हा प्रवास 562 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. या प्रवासाची सुरुवात केप टाऊनच्या टेबल माऊंटन नॅशनल पार्कपासून होते. पुढे बोत्सवानामध्ये असताना तुम्ही ‘चोबे नॅशनल पार्क’ आणि ‘ओकावांगो डेल्टा’ या दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये अवाढव्य हत्ती, सिंह, जिराफ, झेब्रा असे वन्य पाहू शकता. झाम्बिया आणि झिम्बाब्वेच्या सीमाभागात पोहोचलं असता झाम्बेझी नदीपाशी असणारा ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ हा भव्य धबधबा तुमची नजर खिळवून ठेवतो. 14000 मैलांचा प्रवास पूर्ण होताच तुम्ही इजिप्तमध्ये पोहोचता. पुढच्या टप्प्यात जॉर्डनमधून जाताना तुम्ही पेत्रा येथील स्थळाला भेट देऊ शकता. तुर्कीच्या लेक व्हॅन परिसरातून जाण्याचा पर्यायही तुमच्याकडे असतो. तिथून आर्मेनियन किंगडम्सपासून प्रवास पुढे सुरू ठेवा. प्रवासाचा अखेरचा टप्पा असतो जॉर्जिया. शेवटी तुम्ही रशियात पोहोचता.

Back to top button