

न्यूयॉर्क : अमेरिकन संशोधकांनी अलीकडेच एक नवे उपकरण तयार केले असून या उपकरणाच्या माध्यमातून मानवी शरीरातील सूक्ष्म आवाज देखील सहज ऐकता येणार आहे. शरीराच्या कोणत्याही भागातील एका बाजूने वायरलेस उपकरण लावून फुफ्फुसातून आत येणारी, बाहेर जाणारी हवा, हृदयाच्या ठोक्यांचा आवाज तसेच गॅस्ट्रोइंटेस्टायनल टॅक्टच्या माध्यमातून पचन प्रक्रियेचा वेग देखील यामुळे मोजता येऊ शकतो.
मुलायम सिलिकॉनच्या माध्यमातून तयार केल्या गेलेल्या या नाजूक उपकरणाची लांबी 40 मिलिमीटर, रंदी 20 मिलिमीटर व जाडी 8 मिलिमीटर इतकी आहे. नेचर मेडिसन जर्नलमध्ये याचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. या उपकरणाच्या माध्यमातून क्लिनिकल ग्रेड अचूकता तर नोंदवली गेलीच. शिवाय, काही नव्या कार्यक्षमता देखील अधोरेखित केल्या गेल्या आहेत. अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांनी श्वसन व आतड्याच्या विकाराचा अभ्यास करताना ही प्रणाली अभ्यासली. यासाठी त्यांनी वेळेपूर्वी जन्मलेली 15 अर्भके, 55 ज्येष्ठ व्यक्ती आणि 20 श्वासाशी संबंधित जुन्या रुग्णांवर संशोधन केले आणि त्यानंतर हा निष्कर्ष जाहीर केला गेला आहे.