ट्यूमरमुळे उंची झाली 7 फूट 2 इंच! | पुढारी

ट्यूमरमुळे उंची झाली 7 फूट 2 इंच!

लखनौ : ट्यूमरचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते; पण तुम्ही अशा ट्यूमरबद्दल ऐकले आहे का, ज्यामुळे रुग्णाची उंची वाढू लागते. पिट्यूटरी ग्रंथीतील गाठीमुळे एक तरुण विलक्षण उंच झाला होता. डोळ्यांचा त्रास सुरू झाल्यावर ही बाब त्याला समजली. या ट्यूमरमुळे त्या माणसाची उंची इतकी वाढली की तो आपल्या राज्यातील दुसरा सर्वात उंच माणूस बनला. त्याची उंची तब्बल 7 फूट 2 इंच झाली!

रुग्ण सिराज कुमार हा हमीरपूरचा रहिवासी आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्याला लहानपणापासूनच ट्यूमर होता, जो कोणाच्याही लक्षात आला नाही. वयाच्या 23 व्या वर्षी जेव्हा त्याला द़ृष्टीचा त्रास होऊ लागला तेव्हा त्याला याची माहिती मिळाली. डॉक्टरांनी सांगितले की ट्यूमर सुरुवातीला खूप लहान होता आणि ग्रंथींमध्ये वाढीव संप्रेरकांच्या उत्पादनास कारणीभूत होता. यामुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला असून तो उत्तर प्रदेशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात उंच व्यक्ती ठरला आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, कालांतराने ट्यूमर ग्रंथी त्यांच्या मूळ आकाराच्या (12 मि.मी.) (3.5 सेंमी) 3 पट वाढल्या. त्यामुळे रुग्णाला थकवा, अंधुक द़ृष्टी आणि सतत डोकेदुखीची तक्रार होऊ लागली. एमआरआय केला असता त्याला ही विचित्र गाठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर ट्यूमर काढण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी नाकातून मिनिमली इन्व्हेसिव्ह एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वीरीत्या बरे झाल्यानंतर गुरुवारी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने आयुष्मान योजनेंतर्गत रुग्णाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सिराज कुमार म्हणाले, ‘मी एकाच वेळी आनंदी आणि दु:खी आहे. माझी उंची आजारपणामुळे आहे हे जाणून वाईट वाटले आणि माझी द़ृष्टी सुधारत आहे आणि माझी डोकेदुखी दूर झाली हे जाणून आनंद झाला. प्रोफेसर दीपक सिंग, न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख, ज्यांनी ही प्रक्रिया केली, म्हणाले की सिराज हा हार्मोन-सिक्रेटिंग पिट्यूटरी एडेनोमा विथ अपोप्लेक्सी नावाच्या दुर्मीळ अवस्थेने ग्रस्त होता, ज्याचा एक लाख लोकसंख्येपैकी एकावर परिणाम होतो. या स्थितीमुळे ग्रंथींमध्ये ग्रोथ हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव झाला, परिणामी कुमारची प्रौढत्वानंतरही उंची वाढत गेली.

Back to top button