

रोम : इटलीतील क्लॅटेर्ना या प्राचीन रोमनस्थळी करण्यात आलेल्या उत्खननात पुरातत्त्व संशोधकांनी तीन हजार रोमन नाणी आणि 50 रत्ने शोधून काढली आहेत. या नाण्यांवर प्राचीन रोमन देवतांची चित्रे कोरलेली आहेत.
सध्याच्या बोलोग्नाजवळ हे प्राचीन क्लॅटेर्ना नावाचे रोमन गाव आहे. तिथे हे उत्खनन करण्यात आल्याचे इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले. यापूर्वी पुरातत्त्व संशोधकांना क्लॅटेर्नामध्ये प्राचीन काळातील रस्ते, मोझॅक, स्नानगृहे सापडली होती. आता हा रोमन नाण्यांचा खजिनाच सापडला आहे. त्यामध्ये चांदी व ब्राँझची नाणी आहेत. यामधील एक चांदीचे नाणे अत्यंत दुर्मीळ असून ते इसवी सनपूर्व 97 मध्ये बनवलेले आहे. एका प्राचीन थिएटरच्या प्रांगणात ही नाणी लपवलेली होती. याठिकाणी अनेक रंगीत रत्नेही सापडली आहेत. त्यावरही विविध देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.