

न्यूयॉर्क : 'उलटे चालणे' म्हणजे पुढे पावले टाकत चालण्याऐवजी समोरच चेहरा ठेवून मागे पावले टाकत चालणे. 19 व्या शतकात "उलटं-चालणं" हा थोडा विक्षिप्त छंद होता, परंतु सध्याच्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की ते तुमचं आरोग्य आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते.
पॅट्रिक हार्मन नावाच्या 50 वर्षीय सिगार-शॉप मालकाने 1915 च्या उन्हाळ्यात एक वेगळंच आव्हान स्वीकारलं – 20,000 डॉलर जिंकण्याची पैज लावत त्यांनी सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क शहरांदरम्यान उलटं चालायचं ठरवलं. आपण कुठे जातोय पाहण्यासाठी एका मित्र आणि त्याच्या छातीवर लावलेल्या कारच्या एका छोट्या आरशाच्या मदतीने हार्मन यांनी 3,900 मैल (6,300 किलोमीटर) प्रवास 290 दिवसांत पूर्ण केला, संपूर्ण प्रवासात त्यांनी प्रत्येक पाऊल उलट दिशेने टाकलेलं. हार्मन यांनी दावा केला की या प्रवासामुळे त्यांच्या पायाचे घोटे इतके मजबूत झालेत की "त्याला कुठलीही इजा करण्यासाठी थेट हातोड्याचाच वापर करावा लागेल.'संशोधनानुसार, उलटं चालण्याने तुमचं शारीरिक आरोग्य आणि मेंदूला आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात. उलटं-चालणं हा प्रकार संशोधन वर्तुळात चांगलाच परिचित असून त्याला एक समृद्ध इतिहास आहे. 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील लोक शेकडो आणि कधी कधी हजारो मैल उलटं चालत असल्याच्या बातम्या आहेत.
अनेकजण तेव्हा पैजा लावायचे आणि काहीजण आपण कसा जगावेगळा विक्रम केला याच्या बढाया मारत असत. परंतु, जैवयांत्रिक (बायोमेकॅनिक्स) मधील बदलामुळे, उलटं चालण्याचे प्रत्यक्षात काही शारीरिक फायदे असू शकतात. पाठदुखी, गुडघेदुखी आनि संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी फिजिओथेरपीमध्ये याचा वापर केला जातो. काही अभ्यासातून असंही दिसून आलंय की, उलटं चालण्याचा स्मरणशक्ती, प्रतिक्रिया देण्याचा कालावधी आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये यासारख्या आकलन क्षमतांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. निरोगी आरोग्यासाठी उलटं चालण्याची प्रथा प्राचीन चीनमध्ये सुरू झाली, असं मानलं जातं, परंतु खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढवण्याचा एक मार्ग म्हणून अलीकडे अमेरिका आणि युरोपमधील संशोधक याकडे अधिक गांभीर्याने पाहू लागले आहेत.