

नवी दिल्ली : जगभरातील विविध देशांमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाच्या बळावर रेल्वेचे जाळे प्रवास सोयीचा करताना दिसते. भारतातही हेच चित्र. किंबहुना आशिया खंडातील आणि जगातील काही मोठ्या रेल्वे जाळ्यांमध्ये भारताची गणना केली जाते. थोडक्यात रेल्वेप्रवास भारतीयांसाठी नवा नाही. कमी अंतराचा प्रवास असो किंवा मग लांब पल्ल्याचा प्रवास असो, रेल्वेमुळं प्रवासातील वेळही कमी होतो आणि एक वेगळाच अनुभव मिळतो ही बाबही तितकीच महत्त्वाची. पण भारताची हद्द ओलांडून बरंच दूर गेलं असता एक थक्क करणारा रेल्वेप्रवास सर्वांनाच हैराण करून सोडतो. ही एक मालगाडी असून ती तब्बल दोनशे डब्यांची आहे! लांबलचक अजगरासारखी ही गाडी वळणे घेत धावते.
भारतातील रेल्वे प्रवासाच्या तुलनेत सर्वात जास्त लांबीच्या या रेल्वेचा प्रवास तसा धोक्याचा. मॉरीतानिया नावाच्या देशात ही रेल्वेगाडी धावते आणि त्यातून प्रवास करणे म्हणजे जीवाचीच बाजी लावणे. खरंतर ही एक मालगाडी असून, त्यातून प्रवास करणे फार कठीण. प्रवाशांसाठी या ट्रेनमध्ये आसनव्यवस्था नाही आणि शौचालयाचीही व्यवस्था नाही, त्यामुळे अनुभव म्हणून जरी या ट्रेनने प्रवास करायचं म्हटलं तरी अडचणी काही संपणार नाहीत. वाळवंटातून जाणार्या या ट्रेनने सहसा स्थानिक एका ठिकाणहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा नोकरीधंद्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करताना दिसतात. एका वृत्तानुसार या ट्रेनने प्रवास करण्यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. हो, पण या प्रवासात निसर्गाचा माराही सोसावा लागतो. कारण, वाळवंटातील 49 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागतो.